नाल्यातून सख्खे भाऊ गेले वाहून; एकाचा मृत्यू, दुसरा अत्यवस्थ

फुलेवाडी रिंगरोडवरील घटना; नवरात्रौत्सवात कुटुंबीयांचा आक्रोश
brothers swept away in drain one dead
नाल्यातून सख्खे भाऊ गेले वाहून; एकाचा मृत्यू, दुसरा अत्यवस्थPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे भरून वाहत असलेल्या नाल्यातून वाहून गेल्याने केदार मारुती कांबळे (वय 11) या बालकाचा मृत्यू झाला, तर त्याचा भाऊ योहान ऊर्फ जॉन मारुती कांबळे (7, दोघेही रा. फुलेवाडी) याची प्रकृती गंभीर आहे. शनिवारी फुलेवाडी रिंगरोड, अहिल्याबाई होळकरनगर चौक परिसरात शिवतेज तरुण मंडळासमोर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा आहे. फुलेवाडी रिंगरोड येथील नागरिकांसह मनपा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

एकाला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरा भाऊही पडला नाल्यात

गवंडी कारागीर असणार्‍या मारुती कांबळे यांची केदार आणि योहान ही मुले. शनिवारी दुपारी दोघेजण क्लासवरून घराकडे परतत होती. मुसळधार पावसामुळे शिवतेज तरुण मंडळासमोरील नाला पाण्याने भरून वाहत होता. दोन मीटर खोल असलेल्या नाल्यातील पाणी रस्त्यावर आले होते. केदारने नाल्यातील पाण्यात पाय सोडले. तोल गेल्याने तो नाल्यात पडला. डोळ्यांदेखत मोठा भाऊ नाल्यात पडल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात योहान ऊर्फ जॉनही नाल्यात पडला. पाण्याचा जोरदार प्रवाह असल्याने क्षणार्धात दोघेही काही अंतर वाहून गेले.

नाल्याजवळ थांबलेल्या नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी आरडाओरड केली. सलीम मुल्ला, कृष्णात देवकुळे नाल्यात उतरले. मुलांचा शोध घेऊ लागले. दरम्यानच्या काळात मनपा अग्निशमन दलातील जवानही घटनास्थळी दाखल झाले. पाण्याच्या प्रवाहामुळे शोधकार्यात अडचणी निर्माण झाल्या. काही तरुणांनी सिमेंटचे पत्रे टाकून पाण्याचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावरील सिमेंटच्या स्लॅबखाली अडकलेल्या दोन्ही मुलांना बाहेर काढून त्यांना तत्काळ रुग्णालयाकडे हलविण्यात आले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याचे समजताच ऐन नवरात्रौत्सवात फुलेवाडी रिंगरोड परिसरात शोककळा पसरली.

उपचारापूर्वी केदारचा मृत्यू

नाल्यातील पाण्याच्या जोरदार प्रवाहातून बाहेर काढून त्यांना शासकीय रुग्णालयात हलविले; मात्र उपचारांपूर्वी केदारचा मृत्यू झाला. योहान ऊर्फ जॉनची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. कांबळे कुटुंबीय, नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळ, शासकीय रुग्णालय आवारात गर्दी केली होती. चिमुरड्यांच्या आई-वडिलांसह नातेवाईकांचा आक्रोश काळजाला भिडणारा होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news