

कुरुंदवाड : लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीने पोबारा केल्याची धक्कादायक घटना कर्नाटकातील उगार (ता. अथणी) येथे घडली आहे. आग्रा येथील तरुणीशी विवाह लावून देण्यासाठी तब्बल ३ लाख ४० हजार रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला होता. मात्र अवघ्या काही तासांतच नवरी फरार झाली.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुलाकडील नातेवाईकांनी विवाह जुळवणाऱ्या एजंटांना ‘आहेर’ देण्याच्या बहाण्याने बोलावून घेत ओलिस ठेवले आहे. रक्कम परत मिळेपर्यंत त्यांना सोडणार नसल्याचा पवित्रा घेत नातेवाईकांनी कर्नाटक पोलिसात तक्रार दिली आहे.
कुरुंदवाड येथील माळभाग चौकात मजरेवाडी व बस्तवाड येथील तीन आणि मुंबईतील एक, अशा चार एजंटांनी उगार येथील तरुणाला आग्रा येथील मुलीचे स्थळ दाखवले होते. ३ लाख ५० हजारांचा व्यवहार ठरवून एजंटांनी दोन लाख ४० हजारांत चार वाटण्या केल्या आणि मुलीला एक लाख रुपये देऊन विवाह लावून दिला. लग्न आटोपून नवदाम्पत्य उगार येथील घरी आले. रात्री उशिरा नवरीने बाथरूमला जात असल्याचे सांगितले आणि ती बाहेर गेली, ती आलीच नाही. ती पळून गेल्याचे स्पष्ट होताच नातेवाईकांनी एजंटांना फोन करून, बोलवून घेतले आणि डांबून ठेवले.