

इचलकरंजी : मित्रांसोबत इमारतीवर पतंग उडवताना विद्युत वाहिनीचा धक्का लागल्याने रोहित सुनील दोडमणी (वय १६, रा. आदर्श झोपडपट्टी, जवाहरनगर) या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. नवरात्रौत्सवाच्या पूर्वसंध्येला जवाहरनगरमधील गणपत्ती कट्टा परिसरात ही घटना घडली. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.
येथील आदर्श झोपडपट्टीत राहणारे सुनील दोडमणी हे यंत्रमाग कामगार आहेत. त्यांचा मुलगा रोहित हा जवाहरनगर हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत होता. सायंकाळी तो मित्रांसमवेत जवाहरनगरमधील गणपती कट्टा परिसरात इमारतीवर पतंग उडवत होता. यावेळी पतंग काढण्याच्या प्रयत्नात इमारतीजवळून गेलेल्या विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने तो जागेवर कोसळला. निपचित पडलेल्या रोहितकडून प्रतिसाद मिळत नसल्याने तातडीने नागरीक आणि नातेवाईकांनी त्याला आयजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि भागातील नागरिकांनी घटनास्थळी व आयजीएम रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. रोहित याच्या पश्चात आई-वडील, बहीण असा परिवार आहे. या घटनेमुळे जवाहरनगर परिसरात हळहळ व्यक्त होत होती.
रोहित हा मनमिळाऊ स्वभावाचा होता. तो एकुलता होता. रुग्णालयात त्याचा मृतदेह पाहताच आई-वडिलांसह बहिणीने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. पतंगाचा दोरा तुटल्याने पतंगाच्या मागे लागणार्या रोहितच्या मृत्युमुळे दोडमणी कुटुंबाचा एकमेव आधारच हरपला. त्याच्या मित्रांनाही शोक अनावर झाला होता.