

चंदन शिरवाळे
मुंबई : युतीची सत्ता वगळता अनेक वर्षे राज्याच्या सत्तेची सूत्रे हाती बाळगलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला भिवंडी-निजामपूर, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगर आणि वसई-विरार या पाच महानगरपालिकांच्या निवडणुकात साधा भोपळाही फोडता आला नाही. अजित पवार यांच्या गटाला 29 पैकी 24 महानगरपालिकांमध्ये 158 तर शरद पवार गटाला केवळ 36 जागांवर विजय मिळाला आहे.
अजित पवार गटाला एकूण 9 आणि शरद पवार गटाला 19 महापालिकांमध्ये एकही नगरसेवक जिंकून आणता आला नाही. निवडणुका सहा महिन्यांवर आल्यानंतर बैठका आणि मतदार संघात गाठीभेटी घेण्याच्या कार्यशैलीमुळे ही नामुष्की आल्याची चर्चा दोन्ही पक्षांत सुरू झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड हा पवार कुटुंबीयांचा राजकीय बालेकिल्ला समजला जातो. आपला बालेकिल्ला सांभाळण्यासाठी अजित पवार आणि शरद पवार गटाने आघाडी केली. पण हा बालेकिल्लाही भाजपाने उद्ध्वस्त केला. पुणे महानगरपालिकेत अजित पवार गटाला 20 तर शरद पवार गटाला एकही जागा मिळाली नाही.
पिंपरी-चिंचवड महापालिका जिंकण्याच्या दिशेने मैदानात उतरलेल्या अजित पवार गटाला या ठिकाणी 36 जागा मिळाल्या तर शरद पवार गटाला येथेही भोपळा फोडता आला नाही. पिंपरी चिंचवडसह सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, पनवेल, जळगाव, लातूर, परभणी, नांदेड, नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती महानगरपालिका मध्येही शरद पवार गटाची अशीच अवस्था राहिली. नको काका, नको पुतण्या असे म्हणत महापालिका क्षेत्रांतील नागरिकांनी अजित पवार व शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला नाकारले आहे.
महायुतीमध्ये असतानाही भाजपाने या महापालिका निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोबत घेतले नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीत पराभव टाळण्यासाठी त्यांनी शरद पवार यांच्या पक्षासोबत आघाडी केली होती. परंतु, हा खेळ मतदारांना आवडला नाही. तर नाईलाज म्हणून एकमेकांना मैत्रीची टाळी दिल्याचा परिणाम शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अंगलट आला.
एकसंध भूमिका मांडण्यात अपयश
पुणे आणि पिंपरी - चिंचवड महानगरपालिका निवडणुकीची सूत्रे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःकडे घेतली होती. त्यामध्ये शरद पवार गटाच्या नेत्यांना दुय्यम स्थान होते. अर्थमंत्री असलेले अजित पवार केवळ घोषणाचा पाऊस पाडत होते. महापालिकांमधील पाणी, वाहतूक, कचरा व्यवस्थापन, अनधिकृत बांधकाम, विकासकामांचा वेग या मुद्द्यांवर ठोस व एकसंध भूमिका मांडण्यात ते कमी पडले.
राष्ट्रवादीच्या पराभवांची कारणे
अनेक प्रभागांत दोन्ही राष्ट्रवादींचे उमेदवार एकमेकांचेच मत कापत राहिले.
शहरांमधील मूड ओळखण्यात अपयश
एकमेकांमधील अंतर्गत संघर्ष लपविता आला नाही.
निवडणुकीची एकहाती सूत्रे
पाणीटंचाई, वाहतूक कोंडी, पीएमपीएमएल/पीएमटी सेवा, कचरा व्यवस्थापन, अनधिकृत बांधकाम या मुद्द्यांवर दोन्ही राष्ट्रवादी गटांकडून ठोस आणि परिणामकारक मांडणीचा अभाव.
बूथ पातळीवरील यंत्रणा कमकुवत.
अनेक ठिकाणी पदाधिकारी निष्क्रिय.