

तानाजी खोत
कोल्हापूर : सोन्याच्या दराने ऐतिहासिक उंची गाठली असतानाच आर्थिक क्षेत्रात एक विचित्र स्थिती झाली आहे. कोल्हापुरातील राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका आणि गोल्ड फायनान्स कंपन्यांकडे सध्या ‘सोने तारण’ ठेवण्यासाठी जागाच उरलेली नाही. इतकी प्रचंड मागणी सोन्यावरील कर्जाला आहे. सोन्याच्या वाढत्या दराचा फायदा घेण्यासाठी गोल्ड रोटेशनचा ‘गोल्ड रोटेशन’चा व्यवसाय वाढीस लागला आहे. त्यामुळे बँकांच्या तिजोर्या ओसंडून वाहू लागल्या आहेत.
सराफ बाजारात सोन्याचे दर प्रचंड वाढल्याने दागिन्यांच्या विक्रीत घट झाली असली, तरी सोन्याच्या खरेदीत मात्र तेजी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कोल्हापुरातील अनेक चाणाक्ष गुंतवणूकदार स्वतःजवळील जुने सोने बँकेत तारण ठेवायचे. त्यातून मिळणार्या रोख रकमेतून लगेच शुद्ध सोन्याची नाणी किंवा बिस्किटे खरेदी करायची. सोन्याचे दर आणखी वाढले की, ही नवीन खरेदी विकून कर्जाची परतफेड करायची आणि मोठा नफा खिशात टाकायचा. या ‘रोटेशन’मुळे सोन्याची मागणी कागदावर नसली, तरी व्यवहारात प्रचंड आहे. सराफ बाजारात शुकशुकाट; पण गुंतवणूक तेजीत आहे. दागिने घडणावळीचे प्रमाण कमी झाले असले, तरी लगड आणि बिस्किटांच्या खरेदीसाठी गुंतवणुकीचा मोठा ओघ आहे. ‘सोन्याचे दर आणखी वाढतील’ या विश्वासावर कोल्हापूरकर सध्या हा आर्थिक जुगार खेळत आहेत.
आर्थिक अडचणीच्या वेळी सोन्यावर कर्ज घेण्याचे प्रमाण कोल्हापुरात लक्षणीय आहे; मात्र सध्याची स्थिती अभूतपूर्व आहे. सोन्याच्या किमतीतील वाढ इतकी वेगवान आहे की, लोक व्याजाचा दर विसरून केवळ गुंतवणुकीवर मिळणार्या परताव्याचा विचार करून सोने तारण ठेवून मिळणार्या पैशावर सोने खरेदी करत आहेत.
अनेक बँकांना आता सुवर्ण कर्जाचे नवे प्रस्ताव नाकारावे लागत आहेत किंवा मोठी मर्यादा लावावी लागत आहे. दरवाढीचा फायदा घेण्यासाठी कर्ज मुदतपूर्व नूतनीकरण करून नव्याने वाढीव रक्कम घेण्यावरदेखील बँकांनी बंधने टाकली आहेत, अशी माहिती बँकिंग क्षेत्रातील माहितगार सूत्रांनी दिली.
बँका आणि फायनान्स कंपन्यांकडे सोन्याच्या पाकिटांचा ढीग लागल्याने आता जागेचा प्रश्न गंभीर झाला आहे. यावर उपाय म्हणून आणि प्रशासकीय काम कमी करण्यासाठी अनेक मोठ्या गोल्ड फायनान्स कंपन्यांनी आता 2 लाख रुपयांपेक्षा कमी रकमेचे सुवर्ण कर्ज न देण्याचा अनधिकृत निर्णय घेतला आहे. केवळ मोठ्या रकमांचे व्यवहार करण्याकडे संस्थांचा कल वाढला असून, लहान कर्जदारांची यामुळे काहीशी कोंडी होत असल्याचे चित्र आहे.