Gokul Chairman Election | महायुतीच्‍या संचालकांना म्‍हणणे मांडण्‍याचा आदेश

गोकुळ अध्‍यक्ष निवड न्‍यायालयात; समविचारीच्‍या १३ संचालकांकडून कोल्‍हापूर सर्किट बेंचमध्‍ये याचिका दाखल
Gokul Chairman Election |
Gokul Chairman Election | महायुतीच्‍या संचालकांना म्‍हणणे मांडण्‍याचा आदेश
Published on: 
Updated on: 

कोल्‍हापूर : गोकुळ अध्‍यक्ष निवडीसंदर्भात महायुतीच्‍या १२ संचालकांना सोमवारी २ नोव्‍हेंबरला होणार्‍या पुढील सुनावणीमध्‍ये म्‍हणणे मांडण्‍याचे आदेश मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या कोल्‍हापूर सर्किट बेंचचे न्‍यायमूर्ती अभय अहुजा आणि न्‍यायमूर्ती धीरज धोटे यांच्‍या खंडपीठाने शुक्रवारी दिला. अध्‍यक्ष निवडीसंदर्भात राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्‍या तेरा संचालकांनी शुक्रवारी कोल्‍हापूर सर्किट बेंचमध्‍ये याचिका दाखल केली. याचिकेवर दुपारी सुनावणी झाली. दरम्‍यान, महायुतीचे १२ संचालक आणि राज्‍य शासनानेही म्‍हणणे मांडण्‍यासाठी अर्ज सादर केला. अर्ज विचारात घेता न्‍यायालयाने पुढील सुनावणी सोमवारी ठेवली आहे.

गोकुळ अध्‍यक्ष निवडीसाठी गुरुवारी संचालक मंडळाची सभा झाली. मात्र गोकुळच्‍या पोटनियमानुसार कोरमची संख्‍या पूर्ण न झाल्‍यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी ही सभा तहकूब केली. सभा तहकूब केल्‍यानंतर समविचारीच्‍या १३ संचालकांनी अध्‍यक्ष निवड सभेसाठी कोरमची संख्‍या विचारात न घेता बहुमताच्‍या संख्‍येवर अध्‍यक्ष निवड करावी, अशी लेखी मागणी निवडणूक निर्णय अधिकारी चौगुले यांच्‍याकडे केली. मात्र त्‍यांनी ती अमान्‍य केली. यानंतर संचालकांनी समांतर सभा घेत बहुमताच्‍या संख्‍येवर शशिकांत पाटील-चुयेकर यांची अध्‍यक्षपदी निवड केली.

निवडीनंतर शुक्रवारी समविचारीच्‍या संचालकांनी अध्‍यक्ष निवडीबाबत कोल्‍हापूर सर्किट बेंचमध्‍ये धाव घेतली. अध्‍यक्ष निवडीसाठी कोरमची संख्‍या विचारात न घेता बहुमताच्‍या संख्‍येवर राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्‍या १३ संचालकांनी शशिकांत पाटील-चुयेकर यांची अध्‍यक्षपदी केलेली निवड कायदेशीर ठरवावी, अशी याचिका दाखल केली. याचिकेवरील सुनावणीदरम्‍यान न्‍यायालयाने निकालानंतर १५ दिवसांच्‍या आता अध्‍यक्ष निवड पूर्ण व्‍हावी असे सांगत महायुतीचे १२ संचालक अध्‍यक्ष निवडीला का उपस्‍थित राहिले नाहीत. उद्याच अध्‍यक्ष निवड का घेऊ नये, असा प्रश्‍न उपस्‍थित केला.

यावर महायुतीचे संचालक डॉ. चेतन नरके यांच्‍या वकिलांनी म्‍हणणे मांडण्‍याची संधी मिळावी, अशी विनंती न्‍यायालयाला केली. यावर न्‍यायालयाने पुढील सुनावणी २ नोव्‍हेंबरला ठेवत महायुतीच्‍या सर्व १२ संचालकांना म्‍हणणे मांडण्‍याचा आदेश दिला. तसेच या याचिकेला अधिन राहूनच सर्व निर्णय व्‍हावेत, अशी सूचना केली. त्‍यामुळे अशासकीय सदस्‍यांच्‍या निवडीला ब्रेक लागल्‍याची माहिती समविचारी आघाडीकडून देण्‍यात आली. समविचारीच्‍या १३ संचालकांच्‍या बाजूने ॲड. आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडली. यावेळी ॲड. श्रीकृष्‍ण गणबावले उपस्‍थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.