kolhapur | रक्तबंबाळ तरुणाचा सेवा रुग्णालयात धिंगाणा

पोलिसांसमोरच शिवीगाळ, मारामारीचा थरार
 kolhapur |
kolhapur | रक्तबंबाळ तरुणाचा सेवा रुग्णालयात धिंगाणा
Published on
Updated on

कसबा बावडा : कसबा बावडा परिसरातील कौटुंबिक वादाचे पडसाद शनिवारी मध्यरात्री सेवा रुग्णालयात उमटले. उपचारासाठी आणलेल्या जखमी तरुणाची नातेवाईकांशी पुन्हा वादावादी होऊन त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. पोलिस येईपर्यंत रुग्णालय परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाने समजावण्यासाठी आलेल्यांच्या अंगावर जखमेतून वाहणारे रक्त शिंपडल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हा संपूर्ण प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कसबा बावडा येथील शिंदे गल्लीतील सार्थक राजेश शिंदे (वय २७) हा कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीत जखमी झाला होता. डोक्याला दुखापत झाल्याने शनिवारी मध्यरात्री सुमारे १२ वाजता त्याला उपचारासाठी सेवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचवेळी तेथे आलेल्या काही नातेवाईकांशी त्याची पुन्हा शाब्दिक चकमक झाली. काही क्षणांतच वादाने उग्र रूप धारण करत अर्वाच्य शिवीगाळ आणि धक्काबुक्की सुरू झाली.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, उपस्थितांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने जखमेतून वाहणारे रक्त समोरच्यांच्या अंगावर शिंपडण्यास सुरुवात केली. त्यामुळे रुग्णालयातील इतर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली. शस्त्रक्रिया कक्षाकडे जाणाऱ्या मार्गावरही मोठ्या प्रमाणात रक्त सांडल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाने शाहूपुरी पोलिसांना दिली; मात्र सुरुवातीला ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क करण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानंतर काही वेळाने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासमोरही संबंधितांकडून वाद आणि शिवीगाळ सुरू असल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news