

कोल्हापूर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणार्या चांदोली राष्ट्रीय उद्यानात प्रथमच दुर्मीळ अशा काळ्या बिबट्याची (मेलॅनिस्टिक लेपर्ड) अधिकृत नोंद झाली आहे. 20 आणि 21 एप्रिल रोजी विविध बीटमध्ये लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये या देखण्या प्राण्याचे तीन स्वतंत्र फोटो टिपले गेले आहेत. या नोंदीमुळे सह्याद्रीच्या जंगलात ब्लॅक पँथरचा अधिवास असल्याचे आता शिक्कामोर्तब झाले आहे.
वन्यजीव संवर्धनासाठी सकारात्मक संकेत..
ब्लॅक पँथरच्या नोंदीमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधतेला नवे महत्त्व प्राप्त झाले असून, वन्यजीव संवर्धनाच्या द़ृष्टीने हा अत्यंत सकारात्मक व ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.
‘ब्लॅक पँथर’विषयी थोडे...
‘ब्लॅक पँथर’ स्वतंत्र प्रजाती नसून बिबट्याचाच एक प्रकार आहे. शरीरात मेलानीन रंगद्रव्य जास्त असल्याने रंग पूर्ण काळा दिसतो. काळ्या रंगातही ठिपक्यांचा (रोझेट) पॅटर्न काहीवेळा दिसतो. ही अनुवांशिक अवस्था असून, कोणताही आजार नाही. भारतात ‘ब्लॅक पँथर’ म्हणजे काळा बिबट्याच मानला जातो.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची वैशिष्ट्ये
स्थापना : 5 जानेवारी 2010 क्षेत्रफळ : 1,165.57 चौ. कि. मी. समावेश : चांदोली राष्ट्रीय उद्यान + कोयना वन्यजीव अभयारण्य.
दुर्मीळ आणि संकटग्रस्त सस्तन प्राण्यांचे अधिवास
पश्चिम घाटातील महत्त्वाचा जैवविविधता हॉटस्पॉट
पहिल्यांदाच या भागात ‘ब्लॅक पँथर’चे अस्तित्व सिद्ध झाले आहे. या दुर्मीळ जिवाचे संरक्षण करण्यासाठी परिसरात अतिरिक्त कॅमेरा ट्रॅप बसवले जाणार असून, त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल. या एका शोधामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संवर्धन मोहिमेला मोठी उभारी मिळाली.
तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प