

गांधीनगर : गडमुडशिंगी येथे वसगडे सीमेवरील माळी मळ्यात रविवारी पहाटे भानामतीचा प्रकार घडल्याने राजेश अण्णासो माळी व त्यांचे कुटुंब भयभीत झाले आहे.
राजेश माळी हे रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास देवदर्शनासाठी जाण्याच्या तयारीत असताना त्यांना घरासमोर भानमतीचे साहित्य द़ृष्टीस पडले. यामध्ये पाच बाहुल्या , तीनधारी लिंबू, चार साधे लिंबू, चार शंख, दोन अंडी, काळा व रंगीत दोरा, मोहरीचे तेल, हळद, कुंकू, उलट्या पिळाचा पंचधातूचा मोळा अशा साहित्याचा समावेश होता. यातील दोन बाहुल्यांना दोरीने गळा आवळल्याचे द़ृश्य पाहून माळी यांची बोबडी वळली व त्यांनी तत्काळ घरच्या मंडळींना जागे केले. योगायोगाने गांधीनगर पोलिस ठाण्याचे गस्त घालणारे कर्मचारी या घटनास्थळावरून जात होते. त्यांनी द़ृश्य पाहून त्वरित माळी कुटुंबीयांना धीर दिला. पोलिसांनी परिसरात गस्त घालून संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. असाच प्रकार याआधीही शुक्रवारी पहाटे नीता माळी यांच्या निदर्शनास आला होता.