kolhapur market committee | बाजार समिती सभापतिपदी भाजपचे नानासो कांबळेंची बिनविरोध निवड

कोल्हापूर ः शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी नानासो कांबळे यांची निवड झाल्यानंतर त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना निवडणूक निर्णय अधिकारी प्रिया दळणर. शेजारी सूर्यकांत पाटील यांच्यासह अधिकारी, संचालक.
कोल्हापूर ः शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी नानासो कांबळे यांची निवड झाल्यानंतर त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना निवडणूक निर्णय अधिकारी प्रिया दळणर. शेजारी सूर्यकांत पाटील यांच्यासह अधिकारी, संचालक.
Published on
Updated on

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी कागल तालुक्यातील साके येथील भाजपचे नानासो धर्मा कांबळे-साकेकर यांची शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत बिनविरोध निवड करण्यात आली. कांबळे हे माजी आमदार संजय घाटगे गटाचे आहेत.

सभापतिपदासाठी नानासो कांबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यांच्या अर्जाला सूचक म्हणून मावळते सभापती सूर्यकांत पाटील, तर शेखर देसाई यांनी अनुमोदन दिले. निवडणूक निर्णय अधिकारी प्रिया दळणर यांनी सभापतिपदी नानासो कांबळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. या बैठकीला नंदकुमार वळंजू, राजाराम चव्हाण, भारत पाटील-भुयेकर, बाळासाहेब पाटील, प्रकाश देसाई, शेखर देसाई, सुयोग वाडकर, शिवाजी पाटील, संदीप वरंडेकर, मेघा देसाई, कुमार अहुजा, सचिव तानाजी दळवी आदी उपस्थित होते.

ऐनवेळी समीकरणे बदलली; साके येथील नानासो कांबळे यांना पसंती मिळाली

कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीत अखेरच्या क्षणी नाट्यमय घडामोडी घडत कागल तालुक्यातील साके येथील भाजपचे नानासो धर्मा कांबळे-साकेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. सकाळपर्यंत इतर इच्छुकांचीच चर्चा असताना ऐनवेळी राजकीय समीकरणे बदलली आणि कांबळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.

सभापतिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर देसाई आणि काँग्रेसचे सुयोग वाडकर यांच्यासह अनेक इच्छुकांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे जोरदार लॉबिंग केले होते. त्यामुळे निवड चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त होत होती; मात्र अंतिम क्षणी मुश्रीफ यांनी कांबळे यांच्या नावाला पसंती देत सर्व समीकरणे बदलून टाकली. या निर्णयामुळे इतर इच्छुकांना मोठा धक्का बसला. कांबळे यांच्या निवडीमागे कागलला प्रतिनिधित्व देण्यासह माजी आम. संजय घाटगे गटाचे असल्याने त्यांचाही प्रभाव निर्णायक ठरला. सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला जिल्हास्तरावरील मोठ्या पदाची संधी देण्याचा संदेश या निवडीतून देण्यात आला. बाजार समितीला पहिल्यांदाच मागासवर्गीय समाजातील सभापती मिळाला आहे.

कांबळे यांनी 2007 ते 2012 या काळात बोरवडे मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले आहे. एप्रिल 2023 मधील बाजार समिती निवडणुकीत त्यांनी मागासवर्गीय गटातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. संचालक म्हणून त्यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. निवडीनंतर कांबळे समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. ‘गोकुळ’ संचालक अमरिश घाटगे यांनी त्यांचा सत्कार केला.

नेत्यांनी दोषमुक्त करावे : सूर्यकांत पाटील

सभेदरम्यान माजी सभापती सूर्यकांत पाटील यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत भूमिका स्पष्ट करत, मी बाजार समितीत एक रुपयाचाही भ्रष्टाचार केलेला नाही, नेत्यांनी मला दोषमुक्त करावे, असे आवाहन केले.

बाजार समितीमध्ये आज बैठक

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी दुपारी समिती प्रशासन, गूळ उत्पादक शेतकरी, व्यापारी यांची एकत्रित बैठक होत आहे. बैठकीमध्ये दिवसाआड गूळ सौदे काढणे, गुजरातमध्ये भेसळयुक्त गुळावर झालेली कारवाई, कलरचा वापर न करता बनविलेला गूळ खरेदी न करणे आदी मुद्द्यांवर बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. गूळ उत्पादक शेतकरी, व्यापारी यांनी बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news