

चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर : कोल्हापूर भाजपमध्ये निष्ठावंत विरुद्ध नवखे विशेषतः महाडिक समर्थक असा संघर्ष उफाळला आहे. याची दखल पक्षाच्या बैठकीत घेण्यात आली. भाजपमध्ये हॉटेलातून उमेदवारी निश्चित केली जात नाही तर ती पक्ष कार्यालयातून केली जाते, असे ठणकावून सांगत जे पक्षात नाहीत त्यांना ‘तुम्ही भाजपात या, उमेदवारी फिक्स’ असे सांगण्याचा अधिकार कोणी दिला, अशा शब्दांत महेश जाधव यांनी महाडिक समर्थकाला इशारा दिला.
गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष धुमसत आहे. तो जिल्हाध्यक्ष निवडीवेळीही दिसून आला. विजय जाधव हे निष्ठावंत व चंद्रकांत पाटील यांचे समर्थक असल्याने त्यांना जिल्हाध्यक्षपद मिळणार हे निश्चित झाले होते. मात्र या निवडीला महाडिक गटाकडून आक्षेप घेण्यात आला होता. मात्र तो आक्षेप मोडून चंद्रकांत पाटील यांनी विजय जाधव यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले. तेथे निष्ठावंत व महाडिक यांच्यात पहिली ठिणगी पडली.
पुणे पदवीधर मतदारसंघ सभासद नोंदणीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत या वादाचा स्फोट झाला. महेश जाधव यांनी काही निष्ठावंत कार्यकर्ते आपल्याला भेटून उमेदवारीविषयी चर्चा करीत आहेत. विशेष म्हणजे ज्यांच्याबाबत ही चर्चा होते, ते या पक्षात नाहीत. मात्र बाहेरच्या बाहेर कुठे तरी बसून ‘तुझी उमेदवारी फिक्स, तू आमच्या पक्षात ये’ असे निरोप दिले जात आहेत. त्यामुळे पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी आपल्याकडे येऊन अमूक आमक्याला उमेदवारी मिळाली ते तमूक तमक्याने दिली, तो प्रचाराला लागला. आता अशाप्रकारे उमेदवारी मिळत असेल तर आम्ही करायचं काय? असा प्रश्न विचारला होता.
मात्र अशा उमेदवार्या देण्याचा अधिकार त्याला दिला कुणी. जे पक्षात नाहीत त्यांना उमेदवारी देण्याचा अधिकार काय आणि हॉटेलात बसून उमेदवारी वाटणारे हे कोण, अशा शब्दांत जाधव यांनी संबंधितांना इशारा दिला. बैठकीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संबंधित व्यक्ती महाडिक समर्थक असल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे महापालिकेचे 24 प्रभाग हे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात येत असून तेथून अमल महाडिक हे विधानसभेवर नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे या संघर्षाकडे वेगळ्या संदर्भाने पाहिले जाते.
यापूर्वीही भाजपमधील अंतर्गत संघर्षात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट लक्ष घातले होते. 2019 मध्ये पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून निवडून आल्यानंतर पाटील यांचे कोल्हापूरवरील लक्ष कमी झाले होते. मात्र, अलीकडेच झालेल्या पक्षाच्या बैठकीत पक्षावर हुकूमत ठेवताना पाटील यांनी, आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून असे लक्ष घातल्याचे जाहीरपणे सांगून संबंधितांना योग्य भाषेत इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा हा संघर्ष उफाळला आहे.