

सतीश सरीकर
कोल्हापूर : महापालिकेचे 2015-2020 सभागृह. काँग्रेस पक्ष सत्तेत तर भाजप विरोधात होता. आता फासे पलटले. 2026-2031 या पंचवार्षिक सभागृहात भाजप सत्तेत आला आहे. परंतु, प्रबळ विरोधक असलेल्या काँग्रेसला तोडीस तोड असा महापौर भाजपला हवा होता. परिणामी, गेल्या सभागृहात भिडणारी जोडी; काँग्रेस विरुद्ध रूपाराणी असे चित्र होते. त्यामुळेच ओबीसी आरक्षणाची कसोटी असूनही भाजपने अचूक रणनीती आखली. महापौरपदासाठी अंडर करंट जोरात असताना अखेर रूपाराणी निकम यांच्या नावावर भाजपने मोहोर उठविली.
कोल्हापूर महापालिकेच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला जात असून, महायुतीच्या सत्तास्थापनेसह पहिल्यांदाच भाजपचा महापौर होत आहे; मात्र या ऐतिहासिक घडामोडींमागे केवळ विजयाचा उत्सव नव्हता, तर महापौरपदाच्या उमेदवार निवडीसाठी भाजपमध्ये अंतर्गत पातळीवर जोरदार हालचाली, सूक्ष्म राजकीय गणिते आणि ‘अंडर करंट’ कार्यरत होता. महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्याने भाजपमधील इच्छुकांची संख्या मोठी होती. शेवटी अनुभवी, आक्रमक आणि काँग्रेसला सभागृहात सडेतोड उत्तर देऊ शकणार्या रूपाराणी निकम यांच्यावर भाजप नेतृत्वाने शिक्कामोर्तब केले आणि या निर्णयाने अनेक समीकरणे स्पष्ट झाली.
सामाजिक समीकरणाऐवजी राजकारणाचा समतोल साधण्याचे आव्हान
महायुतीने 46 नगरसेवकांचे संख्याबळ गाठत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. महायुतीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपकडेच महापौरपद जाणार हे निकालानंतर स्पष्ट झाले होते. मात्र, महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्याने ‘कोण?’ हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा बनला. भाजपमधून थेट ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेले विजय देसाई, विशाल शिराळे, प्रमोद देसाई, वैभव कुंभार, सुरेखा ओटवकर हे पाच नगरसेवक उघडपणे इच्छुक होते. प्रत्येकाने आपापल्या ताकदीप्रमाणे पक्षांतर्गत लॉबिंग सुरू केले होते. याशिवाय खुल्या प्रवर्गातून निवडून आले असले तरी ओबीसी समाजातून येणारे आणि सलग दुसर्यांदा भाजपच्या चिन्हावर विजयी झालेले रूपाराणी निकम व विजय खाडे हेही महापौरपदाच्या शर्यतीत होते. त्यामुळे भाजपसमोर केवळ सामाजिक समीकरण नव्हे, तर अनुभव, सभागृहातील लढत आणि आगामी पाच वर्षांचे राजकारण याचा समतोल साधण्याचे मोठे आव्हान होते.
भाजपला हवा होता सक्षम चेहरा
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे संख्याबळ भाजपसाठी निर्णायक ठरले. महाविकास आघाडीकडे तब्बल 35 नगरसेवक असून, विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आक्रमक भूमिका घेणार, हे निश्चित आहे. महापालिकेच्या सभागृहात काँग्रेसकडे अनुभवी दिग्गज, अभ्यासू वक्ते आणि राजकीय डावपेचात पारंगत नगरसेवक आहेत. त्यामुळे केवळ सामाजिक आरक्षणाच्या चौकटीत महापौर निवडून चालणार नव्हते, तर काँग्रेसच्या राजकीय आक्रमणाला तोंड देऊ शकेल, असा सक्षम चेहरा भाजपला हवा होता.
निकम धडाकेबाज अभ्यासू नगरसेविका
याच ठिकाणी रूपाराणी निकम यांचे पारडे जड झाले. गेल्या सभागृहात त्यांनी भाजपची भूमिका आक्रमकपणे मांडत काँग्रेसला अनेकदा अडचणीत आणले होते. विकासकामे, प्रशासनातील त्रुटी, आर्थिक शिस्त, भ—ष्टाचाराचे मुद्दे अशा विविध विषयांवर त्यांनी सभागृहात स्पष्ट आणि सडेतोड भूमिका घेतली होती. काँग्रेसच्या राजकीय खेळीला त्यांनी वेळोवेळी प्रत्युत्तर देत स्वतःची ओळख ‘धडाकेबाज आणि अभ्यासू नगरसेवक’ म्हणून निर्माण केली होती.
राजकीय ताकद ठरली महत्त्वाची
या निर्णय प्रक्रियेत ‘अंडर करंट’ महत्त्वाचा ठरला. सुरुवातीला ओबीसी प्रवर्गातील थेट विजयी नगरसेवकांपैकी एखाद्याला संधी मिळेल, अशी चर्चा होती. काही इच्छुकांनी पक्षांतर्गत जोरदार प्रयत्न केले. मात्र, काँग्रेसच्या 35 नगरसेवकांचे संख्याबळ पाहता केवळ सामाजिक समीकरण पुरेसे नाही, तर राजकीय ताकद महत्त्वाची ठरणार, हा सूर हळूहळू वरच्या पातळीवर स्पष्ट झाला. त्यामुळेच ओपन प्रभागातून निवडून आले असले तरी ओबीसी समाजातून येणार्या आणि सलग दुसर्यांदा विजयी झालेल्या रूपाराणी निकम यांचा विचार गंभीरपणे करण्यात आला. अखेर भाजपच्या प्रमुख नेत्यांनी सल्लामसलत करून रूपाराणी निकम यांना महापौरपदाची संधी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे भाजपच्या इतिहासात कोल्हापूरचा पहिला महापौर ठरण्याचा मान रूपाराणी निकम यांना मिळणार आहे. हा निर्णय केवळ व्यक्तीचा नसून भाजपच्या आक्रमक राजकारणाचा संदेश देणारा आहे.