

कोल्हापूर : एकेकाळी काँग्रेस व राष्ट्रवादीची जहागीर असलेल्या पश्चिम महाराष्ट्रावर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्यासाठी ताकद पणाला लावली आहे. अत्यंत आक्रमकपणे भाजपने वाटचाल सुरू केली आहे. मात्र महायुती म्हणून या निवडणुका लढविण्यावर महायुतीतील घटक पक्ष आग्रही आहेत. सध्या भाजपची आक्रमक वाटचाल पाहता घटक पक्षांनी सावध पवित्रा घेतला आहे. आपल्या पक्षाची ताकद कुठे आहे हे नेते आजमावत आहेत.
न्यायालयाच्या निर्णयानंतर या सगळ्या निवडणुका लागणार की नाही हे ठरणार आहे. मात्र नेते आपल्या कार्यकर्त्यांंना त्यासाठी तयार करत आहेत. विशेष म्हणजे महायुतीतील भाजपने कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्र संघटन पर्व आयोजित करून कार्यकर्त्यांना निवडणुका जिंकण्याचा कानमंत्र दिली आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे जे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे, त्यामध्ये न्यायालयात बाजू मांडण्यासाठी चांगला वकील देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे; तर कोल्हापुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात 13 हजार कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे सांगून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
13 हजार कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याची घोषणा करण्याबरोबरच 1 लाख 96 हजार कार्यकर्त्यांना विशेष कार्यकारी अधिकारी करणे, त्यांना योजनांचे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार देणे, यातून कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे भाजपने ठरविले आहे. शिंदे शिवसेनेची सभासद नोंदणी सुरू आहे. तर अजित पवार गट सध्या तरी निवडणुका येतील तेव्हा पाहू या मन:स्थितीत दिसतोय.
कोल्हापूर जिल्ह्यात 2 महापालिका, एक जिल्हा परिषद, 10 नगरपालिका, 3 नगरपंचायती, 12 पंचायत समित्या आहेत. कोल्हापूर महापालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता होती. आता त्यांची व महायुतीची ताकद सत्तेसाठी पणाला लागेल. विसर्जित महापालिकेत भाजपचे 14 सदस्य होते. इचलकरंजी महापालिका स्थापन झाल्यानंतर तेथे पहिलीच निवडणुक होणार आहे. नगरपालिकेत भाजपचे लोकनियुक्त नगराध्यक्ष होते. सत्ता भाजपची होती. कोल्हापूर जिल्हा परिषदेत सुरुवातीला अडीच वर्षे भाजपचे तर उर्वरित अडीच वर्षे काँग्रेसचे अध्यक्ष होते. नगरपालिका नगरपंचायतींवर स्थानिक आघाड्या होत्या.भाजपचे 14 सदस्य होते.
कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेत एक खासदार काँग्रेसचे व एक शिंदे शिवसेनेचे आहेत; तर राज्यसभेचे खासदार भाजपचे आहेत. जिल्ह्यात विधानसभेच्या दहा जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. सहयोगी सदस्यासह शिंदे शिवसेनेचे 4, सहयोगी सदस्यासह भाजपचे 3, जनसुराज्य शक्ती पक्षाचे 2, अजित पवार राष्ट्रवादीचे एक आमदार आहेत. विधान परिषदेचे 2 आमदार काँग्रेसचे आहेत. त्यामुळे दोन आमदार व एक खासदार महाआघाडीचे; तर दोन खासदार आणि दहा आमदार महायुतीचे अशी स्पर्धा आहे. आता सत्ता स्थापन करण्यासाठी महायुती व महाविकास आघाडीला प्रचंड कष्ट करावे लागणार आहेत. हमखास निवडून येणार्या उमेदवारांचा शोध हे त्यांच्यापुढील सगळ्यात मोठा आव्हान असेल.