

कोनवडे : पुरोगामी विचारांच्या कोल्हापूर जिल्ह्यात अंधश्रद्धेचे जाळे किती खोलवर पसरले आहे, याचा प्रत्यय देणारी धक्कादायक घटना भुदरगड तालुक्यातील कूर येथील स्मशानभूमीत उघडकीस आली आहे. एका महिलेचा संसार मोडण्यासाठी आणि अन्य तिघांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी केलेल्या अघोरी प्रकारामुळे पंचक्रोशीत खळबळ उडाली असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी गावातील काही नागरिक एका अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत गेले असता, साफसफाई करताना त्यांना लिंबू, नारळ, गुलाल, एक बाहुली आणि त्याला खिळ्याने टोचलेला एक कागद आढळून आला. कुतूहलाने तो कागद पाहिला असता, त्यावर एका महिलेचे नाव लिहून ‘तिला विवाह बंधनातून सोडचिठ्ठी द्यावी’ असे लिहिले होते. तर त्याच कागदावर अन्य दोन महिला व एका पुरुषाचे नाव लिहून ‘त्यांची वाट, भट्टी लागू दे’ असा मजकूर आढळला. हा प्रकार पाहून उपस्थितांना मोठा धक्का बसला.
एखाद्याचा सुखी संसार मोडून काढण्यासाठी आणि निरपराध लोकांचे वाईट चिंतण्यासाठी अशा अघोरी कृत्यांचा आधार घेतला जात असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यापूर्वीही गावातील मुख्य रस्त्यांवर लिंबू-मिरची टाकण्याचे प्रकार घडले आहेत. या घटनेमुळे गावात उलटसुलट चर्चांना उधाण आले असून, असे प्रकार करणारे आणि करायला लावणार्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे.