

कोल्हापूर : दिवसागणीक प्लास्टिकचा राक्षस रौद्र रूप धारण करत आहे. गंभीर बाब म्हणजे, प्लास्टिक आता केवळ नद्यांच्या प्रदूषणापुरते मर्यादित राहिलेले नसून, ते आता थेट महिलांच्या आरोग्यावर घाला घालत आहे. प्लास्टिकच्या बाटल्या, छोटे कप व जेवणाच्या सिंगल यूज डब्यांवर चकाकी, मजबुती, लवचिकता, चिकटपणा घालवण्यासाठी लावण्यात आलेल्या ‘बिस्फेनॉल ए’च्या थरामुळे महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन निर्माण होते. बिस्फेनॉलचा थर असलेल्या बाटल्यांमधून गरम पाणी पिल्याने किंवा अशा बाटल्या नद्या-नाल्यांमध्ये फेकल्यानंतर हे रसायन नद्यांचे प्रदूषण तर वाढवतेच; पण मानवी शरीरात जाऊन हार्मोनल असंतुलन निर्माण करत असल्याचे समोर आले आहे.
अलीकडेच झालेल्या एका अभ्यासानुसार, देशभरातील 12 राज्यांतील नद्यांमध्ये ‘बीपीए’चे अस्तित्व मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहे. यासोबतच ‘बीपीएस’ (बिस्फेनॉल एस) व ‘बीपीएफ’ (बिस्फेनॉल एफ) ही याची दुसरी रूपेदेखील नमुन्यांमध्ये आढळली आहेत. कोल्हापूरची वरदायिनी असलेल्या पंचगंगा नदीमध्ये दररोज हजारो प्लास्टिकच्या बाटल्या फेकल्या जातात, हे वास्तव आहे. या बाटल्यांमधून सूर्यप्रकाश, उष्णता किंवा रासायनिक संपर्कामुळे ‘बीपीए’ हे रसायन झिरपत असण्याचा धोका आहे. यामुळे वेळीच सावध होऊन पंचगंगा नदीतील प्रदूषकांचा स्वतंत्र अभ्यास करण्याची गरज आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व इतर संस्थांच्या सहकार्याने 12 राज्यांमधून घेतलेल्या 74 पाण्याच्या नमुन्यांपैकी 90 टक्क्यांपेक्षा जास्त नमुन्यांत ‘बीपीए’ आढळला.