

कोल्हापूर/उत्रे/बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यात नागरिकांवर होणारे गव्यांचे हल्ले वाढतच आहेत. उत्रे आणि किसरूळ येथे शनिवारी (दि. 3) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या दोन्ही घटना घडल्या. यामध्ये उत्रेचे माजी सरपंच सर्जेराव सखाराम कांबळे (वय 51) आणि किसरूळ येथील तुकाराम महादेव पाटील (78) हे गंभीर जखमी झाले आहेत.
कोतोली-नांदगाव रस्त्यावर उत्रे येथील पाणपोईजवळ गव्यांच्या कळपाने मोटारीला धडक दिली. यामध्ये चालकाच्या बाजूला बसलेले सर्जेराव कांबळे खाली पडले. त्यानंतर गव्याने त्यांच्यावर केलेल्या हल्ल्यात कांबळे गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना पुढील उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात मोटारीचेही मोठे नुकसान झाले आहे. सर्जेराव कांबळे हे शाहू मार्केट यार्डात 27 वर्षांपासून हमाली करतात. रात्रपाळीचे काम संपवून मित्रासोबत भाजीपाल्याची वाहतूक करणार्या एका मोटारीतून ते घरी परतत होते. कोतोली-नांदगाव मार्गावर वारंवार गव्यांचा कळप निदर्शनास येत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
किसरूळ येथील तुकाराम महादेव पाटील हे शनिवारी सकाळी शेताची राखण करून मुलासह घरी परतत असताना गव्यांच्या कळपामधील एका गव्याने तुकाराम पाटील यांच्या हातामध्ये असलेल्या बॅटरीच्या प्रकाशाला बिथरून हल्ला केला. यात पाटील यांच्या मान व कंबरेजवळ जोरदार मार बसला. शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास पळशीमाळ येथील बाजारभोगाव-पडसाळी मुख्य मार्गावर ही घटना घडली. त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार सुरू आहेत.
आठवडाभरापूर्वी याच गावातील बंडा खोत यांचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. सलग दुसरी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण असून, वन्यप्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी शेतकर्यांकडून होत आहे.