

प्रवीण मस्के
कोल्हापूर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने राज्यातील नर्सिंग महाविद्यालयांमध्ये शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी आधार संलग्न बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बोगस उपस्थिती, कागदोपत्री गैरप्रकार व प्रत्यक्षात गैरहजर असतानाही उपस्थिती दाखवून शासकीय योजनांचा लाभ घेण्याच्या प्रकारांना आता आळा बसणार आहे.
नर्सिंग हा प्रात्यक्षिकांवर आधारित अभ्यासक्रम असल्याने विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती व रुग्णालयातील प्रत्यक्ष प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. मात्र, काही खासगी महाविद्यालयांमध्ये आवश्यक शिक्षक व सुविधा नसतानाही कागदोपत्री पूर्तता दाखवली जात असल्याच्या तक्रारी विद्यापीठाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नर्सिंग विद्यार्थी वेल्फेअर फाऊंडेशनने उपस्थिती प्रणाली पारदर्शक करण्याची मागणी केली होती.
त्याअनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला असून यासंदर्भात विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी संलग्न महाविद्यालयांना परिपत्रक जारी केले आहे. बीएस्सी नर्सिंग, बीएस्सी पदव्युत्तर व एम.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना हा नियम लागू असणार आहे. यापुढे शिक्षक आणि विद्यार्थी यांना ‘आधार’ संलग्न बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक असणार आहे. महाविद्यालयांमध्ये अंगठ्याचा ठसा (फिंगरप्रिंट) आणि चेहऱ्याची ओळख (पेस रेकग्निशन) या माध्यमातून उपस्थिती नोंदवली जाणार आहे. नव्या बायोमेट्रिक प्रणालीमुळे महाविद्यालयात प्रत्यक्ष कोण उपस्थित आहे, याची माहिती अचूक नोंदवली जाणार आहे.
गैरप्रकारांना आळा घालण्यास मदत
राज्यात सुमारे १ हजार ६५० नर्सिंग महाविद्यालये असून, त्यामध्ये ४० हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नव्या प्रणालीमुळे महाविद्यालयातील प्रत्यक्ष उपस्थितीची नोंद ठेवणे शक्य होणार असून, गैरप्रकारांना आळा घालण्यास मदत होणार आहे.