

दिलीप भिसे
कोल्हापूर : झटपट पैसा कमाविण्याच्या मोहात शहरासह मध्यवर्ती ठिकाणी पार्किंग केलेल्या महागड्या दुचाकी लंपास करून त्याच्या सुट्या पार्ट विक्रीचा फंडा जोरात सुरू आहे. जिल्ह्यात रोज सरासरी 7 ते 8 वाहन चोरीच्या घटना घडताहेत. 2021 ते 31 मे 2025 या साडेचार वर्षांत 17 कोटी 74 लाखांच्या 3 हजार 549 दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या. स्थानिक सराईतांसह परप्रांतीय टोळ्यांचा हा फंडा वाहनधारकांची डोकेदुखी ठरत आहे.
शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, पारिख पूल परिसरासह तावडे हॉटेल, रेल्वेस्थानक, राजारामपुरी, रंकाळा तलाव, शिवाजी पूल, व्हिनस कॉर्नर, सीपीआर हास्पिटल परिसर, भवानी मंडप यासह मार्केट यार्डातही वाहन चोरीच्या घटनांचा टक्का वाढल्याचे दिसून येते. 2024 मध्ये 790, तर 1 जानेवारी ते 31 मे 2025 या पाच महिन्यांत 322 दुचाकी लंपास करण्यात आल्या आहेत. याशिवाय आलिशान मोटार चोरीचे प्रकारही घडतात, तो विषय वेगळाच!
वाहन लंपास करणार्या टोळ्यांकडून पूर्वी ग्रामीण भाग अथवा कर्नाटक, गोव्यासह अन्य राज्यांत त्या विक्री करून पैसा कमाईचा फंडा होता; मात्र अलीकडच्या काळात चोरलेल्या दुचाकी अवघ्या काही मिनिटांत खोलल्या जातात. दुचाकींच्या सुट्या पार्टंना मागणी असल्याने स्पेअर पार्ट विक्रीतून पैसा कमाविण्याचा उद्योगच चालविला जात आहे. शिवाय उर्वरित पार्टची भंगारात विक्री केली जाते. पार्ट विक्री करणार्या टोळ्यांच्या उलाढाली जोमात आहेत.