

कोल्हापूर : आंबोलीहून कोल्हापूरच्या दिशेने परतणार्या बाईक रायडर सिद्धेश विलास रेडेकर (वय 25, रा. माळी कॉलनी, टाकाळा, कोल्हापूर) या उमद्या तरुणाचा आजर्याजवळ अपघाती मृत्यू झाला. डोके, पाय आणि छातीवर गंभीर इजा झालेल्या आणि जखमी अवस्थेतही जगण्यासाठी तळमळणार्या या तरुणाला दोन तासांहून अधिक काळ प्राथमिक उपचारही मिळाले नाहीत. आक्सिजनही उपलब्ध झाला नाही. 45 मिनिटे तळमळणार्या तरुणाला घेऊन हॉस्पिटल गाठले; पण वेळ निघून गेली होती. सिद्धेशचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
आंबोलीहून कोल्हापूरकडे परतणार्या बाईक रायडर सिद्धेशच्या मृत्यूने कोल्हापूरकरांच्या मनाला चटका लागला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणांवर दोन तास प्राथमिक उपचार तर मिळाले नाही शिवाय त्यास साधा ऑक्सिजनही मिळाला नाही. अपघाताचा आणि सिद्धेशच्या मृत्यूच्या घटनेचा तपशील वेदनादायी आहे. मन अस्वस्थ करणारा आहे. बांधकाम व्यावसायिक विलास रेडेकर यांचा सिद्धेश हा चिरंजीव... युवकाला बाईक रायडिंगची आवड. मित्रासमवेत रविवारी सकाळी सिद्धेश आंबोलीला गेला. कोल्हापूरकडे परतताना साडेअकराला दुचाकी आणि मोटारीचा अपघात झाला. अपघातात दुचाकीचा चेंदामेंदा झाला. मोटारीच्या दर्शनी भागाचेही नुकसान झाले. भीषण अपघात झाल्यानंतर दोन तास सिद्धेशवर कोणतेही उपचार झाले नाहीत. या काळात सिद्धेशला साधा ऑक्सिजनही मिळाला नाही. त्यामुळे उमद्या तरुणाने प्राण सोडला. सिद्धेश 45 मिनिटे अपघातस्थळी रक्तबंबाळ अवस्थेत तडफडत होता. त्याचे मित्र रस्त्यावरून येणार्या-जाणार्या वाहनधारकांना मदतीसाठी याचना करीत होते; मात्र याकाळात रक्ताच्या थारोळ्यात तळमळणार्या युवकाच्या मदतीसाठी एकही वाहनधारक थांबला नाही. सिद्धेशचे मित्र व अपघाताचा आवाज ऐकून घटनास्थळी धावलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी 108 शासकीय रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. 12 मिनिटांपेक्षा अधिक काळ त्यांची धडपड सुरू होती; पण यंत्रणेने कोणताही प्रतिसाद दिला नाही.
अखेर स्थानिक नागरिकांच्या पुढाकारातून खासगी रुग्णवाहिका बोलविण्यात आली. त्यामध्ये ऑक्सिजन सिलिंडर नव्हते. सिद्धेशचा श्वास हळूहळू मंदावत होता. त्याला ऑक्सिजन पुरवठा झाला नाही. खासगी रुग्णवाहिकेतून त्यास आजरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले; पण तेथेही सिद्धेशवर तत्काळ उपचार देणार्या यंत्रणा नव्हत्या. पोलिसांनीही मृत्यूशी झुंज देणार्या युवकावरील उपचाराकडे लक्ष देण्याऐवजी त्यांनी अपघाताच्या पंचनाम्याच्या प्रक्रियेला प्राधान्य दिले.
क्षणाक्षणाला प्रकृती गंभीर होत असतानाही सिद्धेशला खासगी रुग्णवाहिकेतून गडहिंग्लज येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. आजरा येथून 12 वाजून 35 मिनिटांनी निघालेली रुग्णवाहिका 1 वाजून 25 मिनिटांनी गडहिंग्लज येथील खासगी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. जवळजवळ दोन तास गंभीर अवस्थेतील युवकाला प्राथमिक उपचार अथवा ऑक्सिजन मिळू शकला नाही.
मुलाच्या अपघातामुळे धास्तावलेल्या कोल्हापूर येथील त्याच्या कुटुंबीयांनी राजारामपुरी येथील एका हॉस्पिटलमधून उपचाराची सुविधा असलेली रुग्णवाहिका घेऊन गडहिंग्लज गाठले; पण वेळ निघून गेली होती. सिद्धेशने जगाचा निरोप घेतला होता. एका युवकाची प्राणज्योत मालवली होती. या सार्या घटनाक्रमामध्ये समाजातील सुशिक्षित समजल्या घटकांची काही जबाबदारी आहे की नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. अमानवी असंवेदनशीलता आणि ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेच्या अनास्थेपणामुळे एका तरुणाला जीवाला मुकावे लागले.