‘न्यूटन’च्या अजिंक्य पाटीलला बेड्या; सूत्रधारांपर्यंत केव्हा पोहोचणार?

सीपीआरच्या कोट्यवधींच्या औषध खरेदी घोटाळ्यामागे मोठे रॅकेट
Big racket behind drug procurement scam
औषध खरेदी घोटाळ्यामागे मोठे रॅकेट.Pudhari File Photo

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला परवान्याशिवाय औषधे पुरवठा करणार्‍या ‘न्यूटन’ कंपनीचा पुरवठादार अजिंक्य पाटील याला अखेरीस कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कोट्यवधी रुपयांची औषधे परवान्याशिवाय आणि अवाजवी दराने पुरवठा केल्याचा त्याच्यावर गंभीर आरोप आहे. या कोट्यवधी रुपये घोटाळ्याच्या चौकशीतून सत्य बाहेर काढण्याचे आव्हान कोल्हापूर पोलिसांपुढे आहे. तथापि सीपीआरमध्ये थैमान घालत असलेल्या घोटाळ्याचा अजिंक्य पाटील हा एक धागा आहे. या घोटाळ्याचे एकूण स्वरूप पाहता राजकीय पाठबळ आणि प्रशासकीय हात ओले झाल्याखेरीज हा घोटाळा घडू शकत नाही. नव्हे, तसे पुरावेही उपलब्ध आहेत.

यामुळे अजिंक्य पाटील याच्या चौकशीपर्यंत हे प्रकरण थांबणार, की अजिंक्य पाटीलच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या शासकीय निधीवर दरोडे घालणार्‍या मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचणार, याचा फैसला होण्याची आवश्यकता आहे. कारण ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले गेले, ती पद्धत पाहता जोपर्यंत यावर जनतेचा दबाव राहात नाही, तोपर्यंत या घोटाळ्याचे उघडेनागडे सत्य बाहेर येणे अशक्य आहे.

राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला परवान्याशिवाय औषधे पुरवठा करण्याच्या या प्रकरणावर दै. ‘पुढारी’ने सर्वप्रथम प्रकाश टाकला होता. अनावश्यक आणि अवाजवी दराने केलेल्या या खरेदीतील त्रुटीही वेळोवेळी जनतेसमोर आणल्या. परंतु, पुरवठादार अजिंक्य पाटील याला हात लावण्याचे धाडस प्रशासनामध्ये होत नव्हते. याप्रकरणी कोल्हापुरात राजकीय व सामाजिक संस्थांनी हा विषय लावून धरला. दै. ‘पुढारी’च्या दणक्यानंतर या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी खुद्द वैद्यकीय संचालक कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी आपल्या अहवालात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. परंतु प्रशासन हलत नव्हते. बनावट परवान्याचा विषय असल्याने अन्न व औषध प्रशासनाने गुन्हा दाखल करावा, अशी ‘नरो वा कुंजरो वा’ थाटाची भूमिका घेऊन वेळकाढूपणा केला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी याप्रकरणी गुन्हा दाखल न झाल्यास जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या बैठकीत घुसण्याचा इशारा दिल्यानंतर अजिंक्य पाटीलला अटक झाली. मग ही अटक तीन महिन्यांत का होऊ शकली नाही? वकिलांकडे जामिनासाठी चकरा मारणारा अजिंक्य पाटील पोलिसांना कसा दिसत नव्हता? महाराष्ट्रात बंकर बनविल्याचे ऐकिवात नाही. मग राजरोस फिरणार्‍या आरोपीला अटक न होणे यामागे पाणी मुरले आहे. एका मोठ्या दबावाखाली त्याची अटक टाळण्याचे पुरेपूर प्रयत्न झाले. या दबावाला सूत्रधाराचे लेबल लावून तपास केला, तर कोल्हापुरात राजकीय दबावाखाली कशी लूट सुरू आहे, याची कल्पना येऊ शकते.

राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या घोटाळ्यामध्ये अजिंक्य पाटील हा हिमनगाचा एक तुकडा आहे. त्याच्या कर्तृत्वाची फळे त्याला मिळतीलच. पण या घोटाळ्याला ज्यांनी अप्रत्यक्ष हातभार लावला आहे, त्यांची चौकशी होणे ही काळाची गरज आहे.

तोपर्यंत आरोग्याच्या निधीची लूट राहण्याचा धोका

प्रशासकीय अधिकार्‍याला बाजूला करण्यासाठी कागदोपत्री निविदा समितीची बैठक घेऊन सकारात्मक शेरे तयार केले गेले आणि जिल्हाधिकार्‍यांनीही विद्युतवेगाने प्रशासकीय अधिकार्‍यांच्या शेर्‍याकडे दुर्लक्ष करून अंतिम मोहोर उमटविली. या फाईलवर अंतिम स्वाक्षरी होण्याकरिता जिल्हाधिकार्‍यांच्या दालनाबाहेर सायंकाळी उशिरा किती जणांनी रांग लावली होती, याची माहिती उपलब्ध केली की, या प्रकरणाची व्याप्ती समजू शकते. यामुळे अजिंक्य पाटील हे निमित्त आहे. जोपर्यंत हे प्रकरण पूर्णतः खणून काढले जात नाही आणि कोल्हापूरच्या जनतेला सफेद कपड्यातील लुटारू दाखविले जात नाहीत, तोपर्यंत सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या निधीची लूट कायम राहण्याचा धोका आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news