

बिद्री : बिद्री (ता. कागल) येथील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या गुन्ह्याची व्याप्ती वाढली आहे. या प्रकरणात डॉ. युवराज पांडुरंग पाटील आणि संभाजी वसंत शिंदे यांना तीन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना 27 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर उर्वरित सहा संशयितांना अटक करून त्यांना सोमवार (दि. 30) पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. आणखी दोन संशयित अद्याप फरार आहेत.
आतापर्यंत अटक केलेल्यांमध्ये डॉ. युवराज पांडुरंग पाटील, (वय 43, रा. सोनाळी, ता. कागल), संभाजी वसंत शिंदे (45, रा. बोरवडे, ता. कागल) डॉ. उत्तमकुमार बळवंत सरदेसाई (60, रा. सदर बाजार, कोल्हापूर) (अटक नाही), मनीषा दिनकर कांबळे (35, रा. सावर्डे पाटणकर, ता. राधानगरी), नंदा ईश्वरा गुरव (42, रा. बोरवडे, ता. कागल), बाजीराव श्रीपती तिकोडे (60, रा. मडिलगे बु., ता. भुदरगड), विक्रम आनंदा पाटील, (40, रा. सोनाळी रोड, बिद्री, ता. कागल) सुखदेव ऊर्फ पोपट पांडुरंग पाटील (40, रा. सोनाळी, ता. कागल,) सुनील सदाशिव गुरव (35, रा. सरवडे, ता. राधानगरी), आक्काताई बळवंत कांबळे (रा. बिद्री, ता. कागल) (अटक नाही) यांचा समावेश आहे.
कोल्हापूरसह बेळगाव जिल्ह्यातील अनेक महिलांचे गर्भपात झाल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीतून समोर येत आहे. दरम्यान, डॉ. उत्तमकुमार बळवंत सरदेसाई (वय 60, रा. सदर बाजार, कोल्हापूर) आणि आक्काताई बळवंत कांबळे (रा. बिद्री, ता. कागल) यांना अद्याप अटक झालेली नसली, तरी त्यांची नावे संशयित म्हणून पुढे आली आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच डॉ. युवराज पाटील यांचा वैद्यकीय परवाना निलंबित करण्यात आला होता. त्यामुळे या ठिकाणी सुरू असलेला संपूर्ण प्रकार डॉ. सरदेसाई यांच्या नावावर चालत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.गर्भलिंग निदान आणि गर्भपात केंद्रात हॉस्पिटलमधील महिला कर्मचारीच गर्भपाताची औषधे देत होत्या. मृत अर्भकांचे अवशेष मिळविण्यासाठी फॉरेन्सिक विभागाच्या पथकाने दूधगंगा नदीत पुरावे शोधले. मात्र, पथकाच्या हाती काही लागले नाही. या प्रकारात काही महिलांची सक्तीने फसवणूक केल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.
दूधगंगा नदीत टाकले गर्भ
श्रद्धा हॉस्पिटलमध्ये तपासणीनंतर मुलगी असल्याचे निष्पन्न झाल्यास गर्भपात करून त्या गर्भाची विल्हेवाट लावण्याचे अमानुष प्रकार समोर आले आहेत. या गर्भांना आक्काताई कांबळे या दूधगंगा नदीत फेकून देत असल्याची धक्कादायक माहिती चौकशीत पुढे आल्याचे सहायक पोलिस निरीक्षक क्रांती पाटील यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना दिली.