

बिद्री : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या नूतन इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवार, दि. 23 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी दिली. अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ असून, प्रमुख पाहुणे आ. सतेज पाटील, माजी आमदार बजरंगआण्णा देसाई, संजय घाटगे उपस्थित राहणार आहेत. दुपारी बारा वाजता कारखाना कार्यस्थळावर हा कार्यक्रम होणार आहे.
अध्यक्ष पाटील म्हणाले, ‘बिद्री’ सहकारी साखर कारखान्याने केवळ साखरनिर्मितीच न करता अन्य प्रकल्पही उभारून ते यशस्वी केले आहेत. कारखान्याचा सहवीज प्रकल्प यशस्वी झाला असून त्यामुळे बॅलेन्स शीट अधिक सक्षम झाली आहे. शिवाय कारखान्याची गाळप क्षमताही वाढविण्यात आल्याने अधिकाधिक ऊस गाळप करणे शक्य झाले आहे. यातून सभासदांना जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयन केला आहे.
ते म्हणाले, बिद्री कारखान्याच्या 2017 - 18 च्या वार्षिक सभेत प्रतिदिन 60 हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प उभारण्यास सभासदांनी मंजुरी दिली. यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या. सुमारे 68 कोटी रुपये खर्चून अद्ययावत इथेनॉल प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पातून प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाले आहे.