

कोल्हापूर : शहरातील सर्वाधिक वर्दळीचा आणि करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराकडे जाणारा प्रमुख मार्ग असलेला भाऊसिंगजी रोड लवकरच कोल्हापूरचा पहिला ‘नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित केला जाण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांसह ऐतिहासिक व धार्मिकस्थळे या रस्त्यावर असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेण्याच्या हालचालींना वेग दिला आहे.
भाऊसिंगजी रोड हा पूर्वी जुना राजवाडा आणि नवीन राजवाडा यांना जोडणारा ऐतिहासिक मार्ग म्हणून ओळखला जात होता. आज या मार्गावर सीपीआर रुग्णालय, तहसील कार्यालय, महापालिका मुख्यालय, छत्रपती शिवाजी चौक, भवानी मंडप आणि टाऊन हॉल यासारखी महत्त्वाची स्थळे आहेत.
याशिवाय, अंबाबाई मंदिरासाठी वर्षभर हजारो भाविक या मार्गाने दर्शनासाठी ये-जा करत असतात. दसरा चौकात वाहन पार्क करून पायी मंदिराकडे जाणार्यांची संख्या मोठी आहे. मात्र, रस्त्यावर बेकायदेशीर फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढल्यामुळे नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे.
सीपीआर रुग्णालयाच्या दैनंदिन व्यवहारामुळेदेखील या रस्त्यावर दररोज तीन हजारांहून अधिक नागरिकांची वर्दळ असते. रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर, विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्या नियमित ये-जा यामुळे वाहतूक अडचणीत सापडते.
कोल्हापूरमध्ये अजूनही फेरीवाले धोरण प्रभावीपणे राबवले गेलेले नाही. काही महिन्यांपूर्वी फेरीवाले समितीच्या निवडणुका पार पडल्या; परंतु प्रत्यक्ष कार्यवाहीस अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नो हॉकर्स झोनसंदर्भात वाहतूक समिती, फेरीवाले समिती आणि संबंधित संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून निर्णय घेण्यात येणार आहे.
या रस्त्यावर भविष्यात आणखी काही महत्त्वाची शासकीय केंद्रे उभारली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी आणि पादचार्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हा मार्ग ‘नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित करण्यास प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे.