

कोडोली : कर्जाचा हप्ता जमा करण्यासाठी ग्राहकाकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम खात्यावर जमा न करता वैयक्तिक कामाकरिता वापरून कोडोली येथील भारत फायनान्शियल कंपनी या शाखेची 13 लाख 99 हजारांची फसवणूक करण्यात आली.
याप्रकणी यश महादेव घोटणे (रा. तारदाळ, ता. हातकंणगले) व आकाश जगन्नाथ शिंदे (रा. धनगर गल्ली, माले, ता. हातकणंगले) या दोघांना अटक झाली असून, रणजित पोपट कांबळे (रा. ईगरूळ, ता. शिराळा), तेजस्विनी पाटील (रा. वडगाव, ता. हातकणंगले) या दोघांविरुद्ध कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद विष्णुदास महादेव पांचाळ (रा. साळोखेनगर, कोल्हापूर) यांनी कोडोली पोलिसांत दिली आहे.
संशयित भारत फायनान्शियल इन्फ्लुजन कंपनीच्या कोडोली शाखेत कर्ज देणे व कर्जाची रक्कम वसूल करणे काम करीत होते. त्यांनी ऑक्टोबर 2023 ते मे 2025 या काळात ग्राहकांकडून कर्जाच्या हप्त्याकरिता घेतलेले 13 लाख 99 हजार 647 रुपये कंपनीच्या खात्यावर जमा न करता वैयक्तिक कारणासाठी वापरून कंपनीची फसवणूक केली. यश घोटणे व आकाश शिंदे यांना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडग करीत आहेत.