Rankhamb darshan : मेतकेतील बाळूमामांचा रणखांब दर्शनासाठी आज खुला होणार
हमीदवाडा : थोर संत सद्गुरू बाळूमामा यांचे मूळ क्षेत्र असलेल्या मेतके (ता. कागल) येथील मंदिरात, मामांनी स्वतः रोवलेला ऐतिहासिक रणखांब उद्या, शुक्रवारी (दि. 25) भाविकांच्या दर्शनासाठी खुला होणार आहे. दरवर्षी केवळ श्रावण महिन्यातच या मूळ रणखांबाचे दर्शन घेता येत असल्याने, या सोहळ्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो भाविक दाखल होण्याची शक्यता आहे.
रणखांबाचा इतिहास
संत बाळूमामांनी 1932 साली मेतके येथे आपले दैवत श्री हालसिद्धनाथ मंदिराची स्थापना केली. याच मंदिरात त्यांनी भक्तांच्या ईडा-पिडा दूर करण्याच्या उद्देशाने हा 14 फुटी सागवानी रणखांब स्वतः रोवला होता. या खांबाचे महत्त्व सांगताना मामा स्वतः म्हणायचे की, एक खांब कैलासात व दुसरा मेतक्यात. त्यांच्या या उद्गारांमुळे या रणखांबाचे महात्म्य भक्तांच्या मनात खोलवर रुजले आहे.
श्रावणातील विशेष दर्शन सोहळा
वर्षभरातील अकरा महिने हा मूळ सागवानी खांब संस्थानने तयार केलेल्या पंचधातूच्या आकर्षक वेष्टनात असतो. मात्र, दरवर्षी श्रावण महिन्यात हे वेष्टन काढून मूळ रणखांब दर्शनासाठी खुला करण्याची परंपरा आहे. त्यानुसार, उद्या सकाळी 10 वा. विधिवत पूजा-अर्चा करून हा रणखांब 25 ऑगस्टपर्यंत दर्शनासाठी खुला ठेवण्यात येईल, अशी माहिती संस्थानतर्फे देण्यात आली आहे. रणखांबाचे दर्शन घेणे ही भाविकांसाठी आध्यात्मिक पर्वणी मानली जाते.

