कोल्हापूर : प्रवीण मस्के
बीबीए, बीसीए, बीबीएम, बीसीएम कोर्स राबविणारी महाविद्यालये या वर्षापासून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेशी (एआयसीटीई) संलग्न असणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, राज्यातील काही महाविद्यालयांनी संलग्नता न केल्याने ग्रामीण भागातील महाविद्यालयांमधील हे चार कोर्सेस बंद झाले आहेत. परिणामी विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी मोठी अडचण झाली आहे. बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए), बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (बीसीए), बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (बीबीएम), बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस) हे कोर्सेस यापूर्वी संबंधित महाविद्यालयांकडून चालविले जात होते. यासाठी महाविद्यालयाकडून 10 ते 12 हजार शैक्षणिक शुल्क आकारले जात होते. या वर्षापासून ‘एआयसीटीई’ने हे चार कोर्सेस आपल्या अखत्यारीत घेतले आहेत. त्यासाठी महाविद्यालयांना संलग्नता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु राज्यातील काही महाविद्यालयांनी संलग्नता घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे.
शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर 27, सांगली 26 तर सातारा 20 असे मिळून 73 महाविद्यालयांनी ‘एआयसीटीई’ संलग्नता व राज्य सरकारची मान्यता घेतली आहे. बीबीए, बीसीए, बीबीएम, बीसीएमसाठी दोनवेळा ‘सीईटी’ घेण्यात आली. खासगी महाविद्यालयांनी संलग्नता केल्याने त्यांच्याकडील सर्व जागा भरल्या आहेत; तर दुसरीकडे राज्यभरातील ज्या महाविद्यालयांनी संलग्नता घेतली नाही, अशा महाविद्यालयांतील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याचे समजते.