

इचलकरंजी : वेटरशी झालेल्या किरकोळ वादातून खासगी बँकेचे विभागीय व्यवस्थापक अभिनंदन जयपाल कोल्हापुरे यांच्या खून प्रकरणात आणखी दोघांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी विवेक विठ्ठल साळुंखे (रा. कागल) आणि ओंकार विकास राऊत (रा. निपाणी) या दोघा संशयितांना अटक केली.
या खून प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या 6 झाली आहे. तर, आणखी एका अल्पवयीन संशयिताचा या खून प्रकरणात सहभाग असल्याचा संशय असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. याची माहिती पो.नि. शिवाजी गायकवाड यांनी दिली. कबनूर येथे अभिनंदन कोल्हापुरे यांचा चार दिवसांपूर्वी सिमेंटचा नळा डोक्यात घालून खून करण्यात आला होता. याप्रकरणी पंकज संजय चव्हाण, रोहित जगन्नाथ कोळेकर, विशाल राजू लोंढे आणि आदित्य संजय पोवार या चौघा संशयितांना यापूर्वीच अटक केली आहे. तपासामध्ये, तसेच सीसीटीव्ही फुटेजद्वारे आणखी संशयितांचा हल्ल्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते.