

गारगोटी : आदमापूर येथील संत बाळूमामा ट्रस्टच्या जमीन व्यवहारातील तब्बल ११ कोटी ४३ लाख रुपयांच्या कथित अपहारप्रकरणी तपासाला वेग आहे. दरम्यान, अटक केलेल्या पाचजणांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. रुद्रभटे यांनी ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
डॉ. भीष्म जोतीराम सूर्यवंशी, मदतगार सागर महादेव शिंदे, प्रकाश पांडुरंग मांगले (रा. मुरगूड, ता. कागल), रणजित सुरेशराव सूर्यवंशी (रा. निढोरी, ता. कागल), तन्मय दत्तात्रय बाचणकर (रा. आदमापूर) अशी त्यांची नावे आहेत. तपास अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांनी संबंधित व्यवहारातील रकमा संशयित आरोपींच्या बँक खात्यांवर जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सांगितले. त्यानुसार डॉ. भीष्म सूर्यवंशी याच्या खात्यावर ४ कोटी ८८ लाख, सागर शिंदे याच्या खात्यावर ९३ लाख ६१ हजार, प्रकाश मांगले याच्या खात्यावर १ कोटी ६८ लाख, रणजित सूर्यवंशी याच्या खात्यावर १ कोटी १२ लाख ३३ हजार, तर तन्मय बाचणकर याच्या खात्यावर ३ कोटी ५१ लाख रुपये जमा झाल्याचे नमूद केले.
यातील काही रक्कम पुन्हा डॉ. सूर्यवंशी याला देण्यात आल्याचेही तपासात समोर आल्याचे सांगितले. या प्रकरणाचा तपास व्यापक असून आणखी काही जणांची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे. व्यवहारांची सखोल चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडी आवश्यक असल्याची मागणी उप अधीक्षक पत्की यांनी केली. सरकारी वकील धनंजय बनसोडे यांनीही पोलिस कोठडीची मागणी केली. दरम्यान, संशयितांचे वकील दीपक पाटील यांनी बचाव करताना सर्व व्यवहार बँक खात्यांमार्फत झाले असून अपहार झाल्याचे म्हणणे योग्य नसल्याचा युक्तिवाद केला.