

कोल्हापूर : आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थानमधील ६० कोटी ७५ लाखांच्या अपहारप्रकरणी विशेष तपास पथकाने सहधर्मादाय आयुक्त निवेदिता पोवार यांची चौकशी केली. बुधवार, गुरुवार दोन दिवस चौकशी करून त्यांचा पाच पानांचा जबाब नोंदविण्यात आला. दरम्यान, गुरुवारी काही विश्वस्तांकडेही पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की-कवळेकर यांनी चौकशी केली.
आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थानमध्ये मार्च २०२० ते मार्च २०२६ या कालावधीत मेंढ्यांची विक्री व जमीन खरेदीत ६० कोटी ७५ लाखांच्या अपहारप्रकरणी भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तत्कालीन धर्मादाय निरीक्षक तथा प्रशासक रागिणी खडके, देवस्थानचे सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्यासह कंत्राटदार, एजंट यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जमीन अपहारप्रकरणी डॉ. भीष्म सूर्यवंशी, सागर शिंदे, प्रकाश मांगले, रणजितसिंह सूर्यवंशी, तन्मय बाचणकर यांना अटक केली आहे.
२०२३ मध्ये देवस्थानचे कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांच्या निधनानंतर रागिणी खडके यांची नेमणूक झाली होती. ही नेमणूक सहधर्मादाय आयुक्त निवेदिता पोवार यांनी केली होती. यामुळे बुधवार, गुरुवार निवेदिता पोवार यांची चौकशी विशेष तपास पथकाने केली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील १५ मुद्द्यांच्या अनुषंगाने चौकशी केली असून, ५ पानांचा जबाब नोंदविण्यात आला आहे.
विश्वस्तांची चौकशी
गुरुवारी दिवसभर देवस्थानच्या विश्वस्तांचीही चौकशी करण्यात आली आहे. तसेच या विश्वस्तांमध्ये असलेले वादही मिटविण्यासाठी बैठक घेण्यात आली.
रागिणी खडकेच्या अंतरिम जामीन अर्जावर ४ डिसेंबर रोजी सुनावणी
गुन्हा दाखल झाल्यानंतर निलंबित तत्कालीन प्रशासक रागिणी खडके पसार आहेत. त्यांना अटक करण्यासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण पथकाने विविध ठिकाणी शोधमोहीम राबविली, मात्र त्या मिळून आल्या नाहीत. खडकेच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमधून अंतरिम जामीन मिळवला आहे. यावर ४ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.