बाळूमामा देवालय नुतन ट्रस्टी व कार्याध्यक्ष निवड नियमाला धरूनच : कार्याध्यक्ष धैर्यशील भोसले

बाळूमामा देवालय नुतन ट्रस्टी व कार्याध्यक्ष निवड नियमाला धरूनच : कार्याध्यक्ष धैर्यशील भोसले

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : बाळूमामा देवालय ट्रस्ट आदमापुरच्या कार्याध्यक्षपदी देवालय समितीचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले यांची निवड करण्यात आली. तसेच इतर पाच जणांना ट्रस्टी म्हणून घेण्यात आले आहे. या निवडी नियमाला धरून केल्या आहेत. या निवडी प्रसंगी विरोध करणारे ट्रस्टी उपस्थित होते. त्यानी प्रोसिडिंगवर सह्या केल्या आहेत. जर ही मंडळी आदमापूर गावातील लोकांना ट्रस्टी म्हणून घ्यायला नकार देत असतील तर कारभार कसा करणार असे मत कार्याध्यक्ष धैर्यशीलराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

आदमापूर (ता. भुदरगड) येथे आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये धैर्यशील भोसले यांनी अधिकृत प्रोसिडिंग यावेळी पत्रकारांना दाखवले. जर कार्याध्यक्ष पदासाठी विरोधच होता तर त्यावेळी त्यांनी सह्या का केल्या असा सवाल भोसले यांनी केला. ते पुढे म्हणाले की, दिनांक 18 जानेवारी 2023 रोजीच्या मीटिंगमध्ये आदमापुर गावातील दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे ,यशवंतराव पाटील, संभाजी पाटील ,दिलीप पाटील, यांना नवीन ट्रस्टी म्हणून घेण्याची मान्यता यांनीच दिली आहे. केवळ ही मंडळी आदमापूर गावातील आहेत म्हणून यांचा विरोध सुरू आहे. याबाबत आदमापुरची जनताच योग्य निर्णय घेईल अशी समज ही त्यांनी दिली.

समितीचे माजी कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम हयात असताना 3 फेब्रुवारी 2023 रोजी जी मीटिंग झाली त्या मीटिंगच्या आयत्या वेळच्या विषयांमध्ये स्वतः मगदूम यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी कार्याध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळावा अशी विनंती केली व तशा पद्धतीची नोंद करून त्यांच्याकडे कार्याध्यक्ष पदाची धुरा सोपवून त्यांची निवड केली. या निवडीवर प्रोसिडिंगवर सर्वाच्या सह्या आहेत. मग हे विरोध का करतात हेच कळत नसल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामस्थांना देवालय समितीवर ट्रस्टी म्हणून घेण्याबाबतचा सर्व ठराव एका नामांकित वकिलाच्या समोर झाला असून विद्यमान सचिव रावसाहेब कोणकिरी यांनी यावेळी सर्व उपस्थित ग्रामस्थ व नूतन ट्रस्टी यांचे अभिनंदन करून बाळूमामाचा भंडारा लावून पेढे भरवण्याचे काम केले होते. त्याचा त्यांना विसर पडला की काय असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला जर हे ग्रामस्थांनाच डावलत असतील तर कुणाच्या जोरावर मदतीने इथून पुढे बाळूमामाच्या मंदिराचा कारभार पाहणार आहेत याबाबत शंका निर्माण होत असल्याचे स्पष्ट केले.

आदमापुरचे सरपंच विजय गुरव हे या दोन्ही मिटींगच्या वेळी गैरहजर होते. त्यांना या संदर्भात रीतसर मीटिंगबाबत नोटीस दिली होती, पण तरीही ते मिटींगला गैरहजर होते. विजय गुरव हे देवालयाच्या ट्रस्टीमध्ये पदसिद्ध सदस्य आहेत आणि तेच बाळूमामा देवालयामध्ये भ्रष्टाचार झाला असा आरोप करत आहेत. त्यांच्या या प्रवृत्तीचा या पत्रकार परिषदेच्या वेळी जाहीर निषेध केला गेला.

या पत्रकार परिषदेला कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील ,गोकुळ दूध संघाचे माजी संचालक दिनकरराव कांबळे, बजरंग दूध संस्थेचे चेअरमन यशवंतराव पाटील, संभाजी पाटील, संदीप मगदुम, इंद्रजित खर्डेकर दिलीप पाटील डॉक्टर संताजी भोसले युवा नेते नामदेव पाटील आदी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेवेळी डॉक्टर संताजी भोसले नामदेव पाटील, संभाजी पाटील, बाळासो पाटील यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले. यावेळी जर आदमापुरच्या लोकांना ही मंडळी विरोध करत असतील तर येथून पुढे देवालयाचा कारभार ते कर्नाटकात राहून करणारआहेत काय अशा भावना व्यक्त करत विरोध केला जात आहे. यावेळी ट्रस्टींचा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध केला. दरम्यान यावेळी शेकडो युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

इतिहासात बाळूमामाचे मुख्य कार्यालय प्रथमच बंद…

बाळूमामाच्या संपूर्ण कारभाराचा लेखाजोखा मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या कार्यालयातून पूर्ण केला जातो पण मंगळवार (दि.४) रोजी हे कार्यालय बंद होते. त्यामुळे दिवसभर कोणत्याही पद्धतीचे कामकाज या ठिकाणी झाले नाही. परिणामी याचा त्रास भक्तांना सहन करावा लागला. आज होणाऱ्या मिटींगमुळे गावातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी गारगोटी पोलिसांनी दिलेल्या आव्हानाला आदमापुर ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. गावात दिवसभर तणावपूर्ण शांतता होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news