

कोल्हापूर : आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान समितीमधील ६० कोटी ७५ लाख २८ हजार रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्ह्याचा तपास सोपविण्यात आला आहे, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सोमवारी सांगितले.
धर्मादाय आयुक्त देवस्थान शाखेचे निरीक्षक राजेंद्र गडकरी यांनी संत सदगुरू बाळूमामा देवस्थान समितीच्या तत्कालीन निरीक्षण तथा कार्याध्यक्ष रागिणी खडके, सचिव रावसाहेब विराप्पा कोणकरी (रा. भडगाव, ता. गडहिग्लज) यांच्यासह संबंधित विश्वस्त, व्यापारी, कंत्राटदारासह मध्यस्थांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
संशयितांनी संगनमत, कट कारस्थान रचून विश्वासघाताने फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हा दाखल होताच आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्ह्याचा तपास सोपविण्यात आला आहे. पथकाकडून गैरव्यवहाराचा सखोल तपास केला जाईल, संशयितांना अटक करण्याबाबत तपासाधिकारी निर्णय घेतील, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.