Balumama Devsthan Land Scam
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : आदमापूर (ता. भुदरगड) संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या जमीन व्यवहारातील ११ कोटींच्या अपहार प्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) पाच जणांना बुधवारी (दि. २३) रात्री उशिरा अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, मुख्य संशयित तत्कालीन प्रशासक रागिणी खडके व तत्कालीन सचिव रावसाहेब कोणकेरी पसार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान समितीमधील ६० कोटी ७५ लाख २८ हजार रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे (गुन्ह्याचा तपास) सोपविण्यात आला होता. विशेष तपास पथकाने डॉ. भीष्म जोतिराम सूर्यवंशी-पाटील (वय ३६), सागर महादेव शिंदे (वय ४२), प्रकाश पांडुरंग मांगले (वय ५७, सर्व रा. मुरगुड), रणजितसिंह सुरेशराव सूर्यवंशी (वय ५२, रा. निढोरी, ता. कागल), तन्मय दत्तात्रय बाचणकर (वय २७, रा. आदमापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मार्च २०२० ते मार्च २०२६ कालावधीतील देवस्थान समितीमधील ६० कोटी ७५ लाखांच्या अपहार प्रकरणाचा तपास सुरू आहे.
पथकाने गेल्या महिनाभरात केलेल्या कागदपत्रांच्या तपासणीत या पाचही जणांची नावे ११ कोटींच्या जमीन घोटाळ्यात समोर आली. त्यानुसार बुधवारी रात्री पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की-कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार तुकाराम माने, अजित मुजुमदार, संतोष पाटील, हौसिंग पाटील, रवींद्र पाटील यांनी पाच जणांना मुरगुड, निढोरी परिसरात जेरबंद केले.
देवस्थान परिसरात पार्किंगसाठी जागा कमी पडू लागल्याने काही स्थानिकांकडून जागांची खरेदी केली होती. पण, अवघ्या काही दिवसांपूर्वीच या जागा मूळ मालकांकडून काही एजंटांनी कमी दरात घेतल्या होत्या. देवस्थानला जमिनी विकताना तब्बल ११ कोटी रुपयांचा फायदा मिळवला असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.