

कोल्हापूर : आदमापूर (ता. भुदरगड) संत बाळूमामा देवस्थानमधील ६० कोटी ७५ लाखांच्या अपहारातील ११ कोटी २२ लाखांच्या जमीन घोटाळ्यात विशेष तपास पथकाने (एसआयटी) अतिग्रेच्या माजी सरपंचास अटक केली. सागर सर्जेराव पाटील (४५, रा. अतिग्रे, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. पुणे येथे पसार होण्याच्या प्रयत्नात असताना किणी टोल नाक्यावरून त्याला ताब्यात घेतले.
मार्च २०२० ते मार्च २०२६ कालावधीतील देवस्थान समिती मधील ६० कोटी ७५ लाखांच्या अपहारप्रकरणी धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके व संत बाळूमामा देवस्थान सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली.
विशेष तपास पथकाने देवस्थानच्या कागदपत्रांची तपासणी करून यामध्ये कमी किमतीमध्ये जमिनी घेऊन त्यांची जादा दराने विक्री करून ११ कोटी २२ लाखांचा घोटाळा केल्याचे उघड झाले. याप्रकरणी २३ सप्टेंबरला डॉ. भीष्म सूर्यवंशी - पाटील, सागर शिंदे, प्रकाश मांगले, रणजिंतसिंह सूर्यवंशी, तन्मय बाचणकर यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीमध्ये सागर पाटील याचे नाव समोर आले होते. २४ सप्टेंबरपासून तपास पथक सागर पाटील याचा शोध घेत होते. अखेर मंगळवारी सकाळी त्याला अटक केली. दुपारी त्याला न्यायालयात हजर केले असता, ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मुख्य संशयित तत्कालीन प्रशासक रागिणी खडके व तत्कालीन सचिव रावसाहेब कोणकेरी पसार आहेत.
पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की - कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार तुकाराम माने, अजित मुजुमदार, संतोष पाटील, हौसिंग पाटील, रवीद्र पाटील यांनी ही कारवाई केली.