

प्रा.शाम पाटील
मुदाळतिट्टा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुदरगड तालुक्यातील आदमापुर येथील श्री संत सद्गुरु बाळूमामा यांचा वार्षिक भंडारा यात्रा सुरू आहे. आजपर्यंत झालेल्या सर्व यात्रांमधील गर्दीचा उच्चांक यावर्षी ही यात्रा मोडणार असून भाविकांची विक्रमी नोंद होण्याची चिन्हे यात्रेच्या पहिल्याच दिवशी स्पष्ट दिसत आहेत.
बाळूमामा भंडारा यात्रेचा आज पहिला मुख्य दिवस. जागर. जेवढ्या भंडारा यात्रा आजपर्यंत संपन्न झाल्या त्या यात्रेमध्ये पहिल्या दिवशी जेवढी भाविकांची गर्दी पाहायला मिळत नव्हती त्यापेक्षा यावर्षी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी झाली आहे.
भक्तांच्या मांदियाळीत मुदाळतिट्टा आदमापूर निढोरी हा पाच किलोमीटरचा रस्ता फुलून गेला आहे. भक्तांचे येणे जाणे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रथोत्सव दुपारी तीन वाजता सुरू होणार असून या रथोत्सवाला न भूतो न भविष्यती अशी गर्दी संभवते.
सर्व भक्तांना दर्शन व्यवस्थित व्हावे यासाठी मुख्य दर्शन रांग, मुखदर्शन, बाहेरून दर्शन अशा तीन प्रकारचे दर्शन सुरू आहे. त्यामुळे दर्शन व्यवस्थित होत आहे. पार्किंग एकेरी वाहतूक व्यवस्था चांगली झाली असल्यामुळे पहिल्याच दिवशी भक्तांच्या मध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे. गर्दी वाढता वाढे असेच चित्र सध्या दिसत आहेत. अजून यात्रेचे चार दिवस शिल्लक आहेत. यावर्षीची यात्रा बाळु मामांच्या सर्व यात्रांचे गर्दीचे रेकॉर्ड मोडणार यात काही शंका नाही.