

हमिदवाडा : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व गोवा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सद्गुुरू बाळूमामा यांचे मूळक्षेत्र म्हणून ख्याती असलेल्या मेतके (ता. कागल) येथे शुक्रवार, दि. 27 फेब्रुवारी रोजी भंडारा उत्सव भव्यतेने साजरा होत आहे. हा भंडारा स्वत: सद्गुरु बाळूमामा यांनीच 1932 मध्ये आपले दैवत श्री हालसिद्धनाथ यांच्या नावाने सुरू केला असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. पुढे हा बाळूमामांचा भंडारा म्हणूनही प्रसिद्धीस आला. या सोहळ्याची संस्थानने जय्यत तयारी केली आहे.
मामांनी पहिला भंडारा केला, तेव्हा आतासारखी संपर्क व प्रसार माध्यमे नव्हती, तरीही प्रचंड संख्येने लोक जमले होते. 40 गावांना स्वत: मामांनी जाऊन भंडारा दिला होता. या भंडार्यावेळी 1935 मध्ये कौलव येथील मामांचे भक्तगण कै. कृष्णराव पाटील (कौलवकर) यांनी सोन्याच्या तारांच्या चांदण्या विणलेली त्यावेळच्या पाच हजार रुपये इतक्या किमतीची कनाद मामांना भेट दिली होती. या कनादीच्या भव्य तंबूत अनेक वर्षे हा भंडारा ऊन, वारा, पावसात होत होता. सिद्धपुरुष मामांवर त्यांचे गुरू मुळे महाराज यांच्या असलेल्या कृपाशीर्वादाने हा उत्सव प्रतिवर्षी वाढतच गेला.
भंडारा उत्सवाचे नियोजन सद्गुुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टने केले आहे. त्यांना सर्व तरुण मंडळे, संस्था, ग्रामस्थ, ग्रामपंचायत यांचे सहकार्य आहे. उत्सवांतर्गत शुक्रवार, दि. 27 फेब—ुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता भाकणूक सांगणारे भगवान डोणे (वाघापूर) व मिरज, टाकळी, बेडग आदी 25 गावच्या वालंगांचे आगमन 7 वाजता भव्य सबिना मिरवणूक, धनगरी ढोल वादन, हेडाम नृत्य व वालंग, तर पहाटे 4 वाजता भाकणूक, शनिवार, दि. 28 रोजी सकाळी ज्ञानेश्वरी पारायण सांगता, 9 वा. काल्याचे कीर्तन, 10 वाजता महाप्रसाद व सायंकाळी 5.30 वा. दिंडी असे भरगच्च कार्यक्रम आहेत. या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.
यंदा प्रथमच माऊली अश्वरिंगण सोहळा...
या भंडारा सोहळ्यात प्रथमच मूळ क्षेत्र मेतके येथे माऊली अश्वरिंगण सोहळ्याचे आयोजन केले आहे. यासाठी 194 वर्षांची वारीच्या सोहळ्याची समृद्ध परंपरा असलेले उर्जितसिंग शितोळे सरकार यांचे अश्व येथे येणार आहेत. शुक्रवार 27 रोजी सकाळी 10 वाजता हा रिंगण सोहळा गावच्या आग्नेयला होणार आहे. यासाठी ट्रस्टने मोठी तयारी केली आहे. टाळ मृदंगाच्या गजरात सकाळी 9 वाजता बाळूमामा मंदिरापासून अश्वांची शोभायात्रा रिंगण स्थळाकडे मार्गस्थ होईल.