

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरून महायुतीत निर्माण झालेला तिढा अद्याप सुटलेला नाही. मुंबईत बुधवारी रात्री उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली; मात्र तोडगा न निघाल्याने अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचे ठरले. तर, ‘गोकुळ’च्या निवडणुकीला महायुती म्हणून एकत्रित सामोरे जाण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 20, भाजपला 12, जनसुराज्यला 6 आणि शिवसेनेला 9 जागा मिळाल्या आहेत. महापालिका निवडणुकीत भाजपला महापौरपद मिळाल्याचा दाखला देत राष्ट्रवादीकडून ‘जो न्याय महापालिकेला, तोच जिल्हा परिषदेला,’ अशी भूमिका मांडण्यात आली. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी अध्यक्षपदावर दावा सांगितला आहे. भाजपकडून भाजप-जनसुराज्य-शिवसेना यांच्या एकत्रित संख्याबळाचा आधार घेत अध्यक्ष भाजपचाच असावा, अशी भूमिका मांडण्यात आली. त्यामुळे सत्तावाटपावरून खेचाखेची वाढली.
बैठकीस पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार राजेश क्षीरसागर, विनय कोरे, अमल महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, माजी आमदार प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर, जनसुराज्यचे समीत कदम यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेते उपस्थित होते. तथापि, चर्चेत एकमत न झाल्याने अध्यक्षपदाचा निर्णय आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कोर्टात गेला असून, त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईत बुधवारी रात्री उशिरा बैठक झाली; पण कोणताच निर्णय झाला नाही. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच सर्वाधिकार दिले असून, अध्यक्षपद आणि सत्तावाटपाचा ‘फॉर्म्युला’ तेच ठरविणार आहेत. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत मात्र महायुतीच्या सर्व घटकांना एकत्रित सामोरे जाण्याचा निर्णय झाला.
रात्री उशिरापर्यंत खल सुरूच
जिल्हा परिषद अध्यक्षपदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने आग्रही भूमिका घेतली आहे. तर, भाजपनेदेखील आपला दावा सोडलेला नाही. या दोन्ही प्रमुख पक्षांत अध्यक्षपदावरून खेचाखेची सुरूच आहे. चर्चेचा खल रात्री उशिरापर्यंत सुरू होता. महापालिकेच्या राजकारणाचीही त्याला किनार आहे. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला पदांपासून दूरच ठेवले आहे. त्यामुळे त्याचे पडसाद या बैठकीत उमटले.