

कोल्हापूर : दारूच्या नशेत सतत पैशाची मागणी करून वारंवार भांडण काढून मोबाईल फोडल्याच्या रागातून गवंडी महादेव गवसेकर याचा खून केल्याची कबुली मुकादम कल्लाप्पा मळवकरने दिली. रागाच्या भरात थापीने महादेवच्या छातीवर आणि डोक्यात तसेच हातावर थापीने वार केल्याची कबुलीही मळवकर याने दिली. बुधवारी सकाळी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
बालिंगा (ता. करवीर) येथील हनुमान गल्लीत राहणाऱ्या महादेव गवसेकर (रा. खानापूर, जि. बेळगाव) खून प्रकरणी मुकादम कल्लाप्पा मळवकर याला मंगळवारी पंढरपुरातून पकडले. तो फरशी फिटिंगची कामे करत होता. महादेव गवसेकर आणि काही गवंडी असे सर्वजण बालिंगा येथे एकाच खोलीत राहण्यास होते. महादेवला दारूचे व्यसन होते, दारूच्या नशेत तो मळवकरसोबत वारंवार वाद करत होता. यातूनच एक ऑक्टोबरला सकाळी ७ च्या सुमारास दोघांत परत वादावादी झाली. यावेळी गवसेकरने रागाच्या भरात मुकादम मळवकरचा मोबाईल फोडला. याच रागातून मळवकरने थापीने डोक्यात केलेल्या घावामुळे गवसेकर बेशुद्ध झाला. यातचा त्याचा मृत्यू झाला.
गाववाला म्हणून मदत केली अन् ...
संशयित मळवकर बेळगांवच्या टोनमध्ये बोलत होता. यावेळी मिरजेत त्याला काही तरुण भेटले. ओळख वाढवून त्याने तरुणांशी मैत्री केली. हे तरुणही मळवकरच्या नजीकच्या गावातील निघाले. बायकोने आपला मोबाईल काढून घेतला असून, पैसे देखील संपल्याचे सांगितले. यामुळे तीन तरुणांनी त्याला मदत केली. मात्र हे तरुण चौकशीच्या फेऱ्यात अडकले.
पुन्हा येऊन शर्ट बदलला...
खुनानंतर मळवकर मिरजेपर्यंत गेला यानंतर तो पुन्हा कोल्हापुरात आला. बालिंगा येथे जाऊन त्याने खोलीत स्वत:चा शर्ट बदलला. यावेळी गवसेकर अंथरुणातच पडून होता. कपडे बदलून मळवकर खोलीला बाहेरून कडी लावून निघून गेल्याची माहिती समोर आली. यानंतर तो पुन्हा मिरजमार्गे पंढरपूरला रेल्वेने गेला.