Kolhapur News | बालिंगा - दाजीपूर राज्यमार्गाच्या अपुर्ण कामांमुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात?, वारंवार अपघाताच्या घटना!

वाहतूक कोंडी सततची, गर्दीच्या ठिकाणी एकेरी मार्ग, पसरलेल्या मोठ्या खडीमुळे दुचाकी घसरुन अपघाताचा धोका
बालिंगा - दाजीपूर राज्यमार्गाच्या अपुर्ण कामांमुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात?
बालिंगा - दाजीपूर राज्यमार्गाच्या अपुर्ण कामांमुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात?
Published on
Updated on

शिरोली दुमाला : बालिंगा–दाजीपूर राज्यमार्गावरील अपूर्ण रस्ते कामांमुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात येत आहे. बालिंगा ते शिरोली दुमाला या मार्गावर वाहनांची संख्या मोठी आहे. कोल्हापूरला विविध कामांसाठी येणारे नागरिक, विद्यार्थी, कामगारवर्ग यांची वर्दळ या रस्त्‍यावर नेहमी असते. गेली दोन वर्षे झाले या रस्त्याचे काम सुरु आहे, अनेक ठिकाणी रस्ता, व साईडपट्ट्या खोदून ठेवल्या आहेत. अर्धवट रस्ते केले आहेत, त्‍यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत.

शुक्रवारी सावरवाडी फाटा ( ता. करवीर) येथे समोरील वाहनाला साईट देण्याच्या नादात एकेरी मार्गावरील काँक्रिट रस्त्यावरून एक चारचाकी वाहन खाली जाऊन रस्त्यावरच अडकली. सुदैवाने चालकाने वेळीच वाहनावर नियंत्रण मिळविल्याने अपघात टळला. या ठिकाणी काँक्रिट रस्त्याच्या बाजूच्या लोखंडी सळ्यांमुळेही धोका वाढला आहे.

सावरवाडी फाटा येथे राज्यमार्गाच्या एका बाजूचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून दुसऱ्या बाजूचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंमध्ये उंचीचा फरक निर्माण झाला आहे. याच ठिकाणी समोरून येणाऱ्या वाहनांना बाजू देताना चारचाकी वाहन काँक्रिट रस्त्याच्या कडेवरून खाली उतरले आणि लोखंडी सळ्यांमध्ये अडकले.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत वाहन सुरक्षितपणे बाहेर काढले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अपूर्ण रस्ते कामे आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सांगितले.

अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करा, अन्यथा आंदोलन करू

बालिंगा–दाजीपूर राज्यमार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्याची कामे अपूर्ण अवस्थेत असून अनेक ठिकाणी साईट बाजू भरलेल्या नाहीत. भरलेल्या साईट पट्ट्यावर चिखल झाला आहे. धोकादायक ठिकाणी सूचना फलक, बॅरिकेड्स आणि इशारा चिन्हेही नाहीत. संबंधित रस्ते अधिकाऱ्यांना कल्पना देऊनही त्यांच्याकडून टाळाटाळ होत आहे. जर अपूर्ण कामे तात्काळ सुरू केली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करू.

-- अमर कंदले, उपाध्यक्ष मनसे करवीर तालुका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news