Bajiprbhu Deshpande | 'बाजीप्रभूं'ना पावनखिंडीत वाहिली आदरांजली, ३०० मावळ्यांच्या शौर्याला ३६६ वर्षे पूर्ण!

'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणांनी दुमदुमली खिंड, हजारो दुर्गप्रेमी, महसूल-पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती, महसूल विभागाच्या वतीने मानवंदना व आदरांजलीचा कार्यक्रम
पावनखिंड येथे बाजीप्रभूच्या स्मृतिस्थळास अभिवादन करताना प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार शुभांगी जाधव, जिल्हा परिषद सदस्या स्नेहल वेल्हाळ, सरपंच चंद्रकांत पाटील आदी.
पावनखिंड येथे बाजीप्रभूच्या स्मृतिस्थळास अभिवादन करताना प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार शुभांगी जाधव, जिल्हा परिषद सदस्या स्नेहल वेल्हाळ, सरपंच चंद्रकांत पाटील आदी.
Published on
Updated on

​विशाळगड : ‘पन्हाळगड-विशाळगड’ दरम्यान शिवछत्रपतींच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि शेकडो ज्ञात-अज्ञात मावळ्यांच्या शौर्याला १३ जुलै रोजी ३६६ वर्षे पूर्ण झाली. या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधत, बाजी-फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शाहुवाडी महसूल विभागाच्या वतीने पावनखिंड येथील स्मृतीस्थळास शासकीय मानवंदना व आदरांजली वाहण्यात आली.

​प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार शुभांगी जाधव, जिल्हा परिषद सदस्या स्नेहल वेल्हाळ, आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या हस्ते वीर बाजीप्रभूंच्या स्मृतीस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'नरवीर बाजीप्रभू देशपांडे की जय' अशा घोषणांनी सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

​"नरवीर बाजीप्रभूंनी दाखवलेले शौर्य आणि दिलेले सर्वोच्च बलिदान आजही प्रत्येक राष्ट्रभक्ताला ऊर्जा देत राहील," असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या स्नेहल वेल्हाळ यांनी केले. १३ जुलै १६६० रोजी घोडखिंडीत झालेल्या या ऐतिहासिक युद्धात, विशाळगडाकडे कूच करणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या रक्षणासाठी बाजीप्रभूंनी केवळ ३०० मावळ्यांसह सिद्दीच्या अथांग सैन्याला खिंडीत रोखले. धारातीर्थी पडेपर्यंत शत्रूची खांडोळी करणाऱ्या या वीरांच्या रक्ताने 'घोडखिंड' पावन झाली अन् इतिहासात 'पावनखिंड' झाली.

​या सोहळ्यास नायब तहसीलदार प्रदीप जाधव, नरेंद्र गायकवाड, तलाठी घनश्याम स्वामी, पंचायत समिती सदस्य सुरेश पवार, मंडल अधिकारी त्रिवेणी पाटील, सरपंच चंद्रकांत पाटील, ग्रामसेवक युवराज माने, पोलीस पाटील उदय जंगम, केतन वेल्हाळ, कोतवाल प्रणित कदम, सोनबा कांबळे आदीसह पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेतील हजारो दुर्गप्रेमी, महसूल-पोलीस कर्मचारी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच या पावनभूमीत नतमस्तक होत ज्ञात-अज्ञात मावळ्यांच्या हौतात्म्याला अभिवादन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news