

कोल्हापूर : दलित, कष्टकरी यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून चळवळींच्या माध्यमातून संघटन करणाऱ्या डॉ. बाबा आढाव यांची कोल्हापुरातील समाजवादी विचारांच्या चळवळींसोबत घट्ट नाळ जुळली होती. सोमवारी त्यांच्या निधनाने कोल्हापुरातील कष्टकरी, शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या संघटनांसोबत साठ दशकांचा स्नेहधागा विरल्याची भावना दाटून आली. राजर्षी शाहू पुरस्काराने डॉ. आढाव यांचा सन्मान करण्यात आला होता, त्या क्षणांचा पट डॉ. आढाव यांच्या सामाजिक कार्यातील सहकाऱ्यांच्या डोळ्यासमोर तरळला.
साठ वर्षांपासून डॉ. आढाव आणि कोल्हापूर यांच्यात एक बंध तयार झाला होता. शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी आयुष्य वेचलेल्या डॉ. आढाव यांचे सतत कोल्हापुरात येणे असायचे. एन. डी. पाटील, गोविंदराव पानसरे, बापूसाहेब पाटील, सुरेश शिपूरकर, व्यंकप्पा भोसले, विठ्ठल बने, उदय कुलकर्णी यांच्यासह कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्यांची मोट बांधण्यात डॉ. आढाव यांचा मोठा वाटा होता. कोल्हापुरात करवीर तालुक्यातील आमशी या गावात दलितांवरील अन्यायाविरोधात सत्याग््राह करण्यात आला होता. या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. आढाव यांनी केले होते, तेव्हा ते कोल्हापुरात ठाण मांडून होते. सीमाभागातील देवदासी प्रथेच्या विळख्यात अडकलेल्यांसाठी वैचारिक उठाव करण्याकरिता गडहिंग्लजमध्ये परिषद झाली होती. या परिषदेसाठी चळवळ उभी करण्यात डॉ. आढाव यांचे योगदान होते. कोल्हापूर जिल्ह्यातील भटके विमुक्त समाजातील लोकांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळावा यासाठी व्यंकप्पा भोसले यांच्यासोबत डॉ. आढाव यांनी प्रचंड काम केले. समाजवादी विचारांच्या लोकांसोबत डॉ. आढाव यांनी कोल्हापुरात संघटन सक्रिय केले.
शाहू पुरस्काराने सन्मान
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणाऱ्या शाहू पुरस्काराने डॉ. बाबा आढाव यांचा सन्मान करण्यात आला होता. डॉ. आढाव यांच्या निधनाचे वृत्त समजताच पुरस्कार प्रदान कार्यक्रमातील अनेक आठवणी सामाजिक क्षेत्रातील सहकाऱ्यांच्या ओठावर आल्या.
चाफ्याची फुले अन् आभाळाची आम्ही लेकरे हे गीत
डॉ. बाबा आढाव आणि ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांचे खूप घनिष्ठ संबंध होते. कोल्हापुरातीलच नव्हे तर राज्यातील अनेक आंंदोलन, चळवळी, परिषदा यांचे नियोजन करण्यासाठी ते पाटील यांच्यासोबत तासन्तास चर्चा करत. जेव्हा जेव्हा ते एन. डी. पाटील यांच्या भेटीसाठी कोल्हापुरात येत तेव्हा चाफ्याची फुले घेऊन येत. दोघांच्या नात्याचा गंध चाफ्याच्या फुलांनी वर्षानुवर्षे ताजा ठेवला होता. तर रयत संस्थेच्या शाळेला भेट दिली की विद्यार्थ्यांना डॉ. आढाव हे हमखास आभाळाची आम्ही लेकरे हे गाणं म्हणायला लावत. डॉ. आढाव यांच्याविषयीची ही हृद्य आठवण एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी सांगितली.