

आशिष ल. पाटील
गुडाळ : लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) व्यासपीठापासून दूर असलेले आणि राजकीय विजनवासात गेलेले जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील अखेर स्वगृही परतले आहेत. त्यांच्या या राजकीय पुनरागमनामुळे राधानगरी तालुक्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीच्या निमित्ताने शनिवारी (ता. २) अर्जुनवाडा येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून पाटील पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर सक्रिय होणार आहेत.
शनिवारच्या मेळाव्यासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची छायाचित्रे असलेले फलक लावण्यात आल्याने, पाटील यांच्या राष्ट्रवादीतील पुनरागमनावर शिक्कामोर्तब झाले आहे. भैय्या माने यांच्या संभाव्य उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर होणारा हा मेळावा, पाटील यांच्यासाठी पक्षात पुन्हा सक्रिय होण्याचे माध्यम ठरला आहे.
ए. वाय. पाटील यांची घरवापसी होत असली तरी, पक्षांतर्गत संघर्षाची ठिणगी अद्याप विझलेली नाही. यामागे काही प्रमुख कारणे आहेत:
जुनी नाराजी: मंत्री हसन मुश्रीफ यांनी मेहुणे-पाहुण्यांच्या (ए. वाय. पाटील आणि माजी आमदार के. पी. पाटील) वादात नेहमीच के. पी. पाटील यांची बाजू घेतल्याची भावना ए. वाय. पाटील यांच्या मनात कायम आहे. याच नाराजीतून ते पक्षापासून दुरावले होते.
'गोकुळ'चा नवा संघर्ष: आगामी 'गोकुळ' दूध संघाच्या निवडणुकीसाठी ए. वाय. पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, दुसरीकडे त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी के. पी. पाटील यांनी, ए. वाय. पाटील यांची साथ सोडून गेलेले विद्यमान संचालक प्रा. किसनराव चौगले यांना उमेदवारी जाहीर करून नव्या संघर्षाला तोंड फोडले आहे. त्यामुळे आगामी काळात 'गोकुळ' आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हा पक्षांतर्गत संघर्ष अधिक तीव्र होण्याची दाट शक्यता आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन मंत्री हसन मुश्रीफ यांनी राधानगरी तालुक्यात पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल पाटील यांच्या प्रवेशामुळे तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांच्या मक्तेदारीला शह बसणार असल्याचे चित्र आहे. एकीकडे ए. वाय. पाटील यांची घरवापसी आणि दुसरीकडे के. पी. पाटील यांची उघड नाराजी, अशा परिस्थितीत मंत्री हसन मुश्रीफ हे 'मेहुणे-पाहुण्यां'च्या या दोन तलवारी एकाच म्यानात कशा ठेवणार, याकडेच संपूर्ण राधानगरी तालुक्याचे राजकीय वर्तुळ लक्ष ठेवून आहे.