

इचलकरंजी : इचलकरंजीच्या दीर्घकालीन पाणी प्रश्नाच्या निराकरणासाठी जुने दानवाड उद्भव राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इचलकरंजीकरांच्या वतीने योजनेचे प्रतीक म्हणून राधाकृष्णाची मूर्ती भेट देत आ. राहुल आवाडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या योजनेमुळे शहराचा भविष्यातील पाणीपुरवठा अधिक सक्षम होणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला न्याय मिळाल्याने समाधान व्यक्त करत आभार मानले. यावेळी सौ. मौसमी आवाडे उपस्थित होत्या.
शहराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सातत्याने भेडसावत आहेत. काही योजना मंजूर झाल्या; पण नदीकाठावरील विरोधामुळे त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आ. आवाडे यांनी शहराच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन कोणताही विरोध किंवा वाद निर्माण होणार नाही, अशी जागा योजनेसाठी शोधली. जुने दानवाड येथील पुरातन राधाकृष्ण मंदिर परिसरातून पाणी घेण्यास कोणतीही अडचण नसल्याची संपूर्ण माहिती व तांत्रिक आकडेवारीचा अभ्यास करून त्याबाबतचा प्रस्ताव शासन दरबारी सादर केला.
या योजनेसंदर्भात झालेल्या बैठकीत आ. आवाडे यांनी सविस्तर विवेचन केले आणि चार दिवसांपूर्वी इचलकरंजीत झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीसाठी राधाकृष्ण पाणी पुरवठा योजना जाहीर करत त्यासाठी लागेल तो निधी राज्य शासन देईल असेही सांगितले. त्यामुळे या योजनेला मिळालेल्या मंजुरीनंतर योजनेचे प्रतीक म्हणून आ. आवाडे आणि सौ. मौसमी आवाडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना राधाकृष्णाची मूर्ती भेट दिली. तसेच शहराच्या विकासासाठी आणखी सहकार्याचीही अपेक्षा व्यक्त केली.