Kandalgaon Murder | कंदलगावजवळ रिक्षाचालकाचा हत्याराचे वार करून निर्घृण खून; अनैतिक संबंधातून प्रकार घडल्याचा संशय

Kandalgaon Murder |
Kandalgaon Murder | कंदलगावजवळ रिक्षाचालकाचा हत्याराचे वार करून निर्घृण खून; अनैतिक संबंधातून प्रकार घडल्याचा संशय
Published on
Updated on

उजळाईवाडी : कंदलगाव हद्दीतील गिरगाव रोडवरील पालकोबाच्या डोंगर परिसरात महादेव धाऊ बोडके (वय ४५, मूळ गाव साळवण-निवडे, ता. गगनबावडा. सध्या रा. बोंद्रेनगर) या रिक्षाचालकाचा निर्घृण खून झाला. दोरीने गळा आवळून व डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे तपासात समोर आले आहे. अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक संशय असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. संशयितांचा शोध वेगाने सुरू आहे.

बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास शेताकडे गेलेल्या नागरिकांना कंदलगाव ते गिरगाव मार्गावरील संजय शिरगावे यांच्या शेताच्या बांधावर मृतदेह दिसला. याची माहिती ग्रामस्थांनी पोलीसपाटील अजित पाटील यांना दिली. त्यांनी गोकुळ शिरगाव ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांना कळविले. पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी आप्पासाहेब पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.

दरम्यान, मंगळवारी दुपारी सुमारे चारच्या सुमारास महादेव बोडके हे रिक्षा घेऊन घराबाहेर पडले होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नसल्याने पत्नी मंगल यांनी बुधवारी पहाटे करवीर पोलिस ठाण्यात पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्यांच्या मोबाईल फोनचे लोकेशन तपासण्यास सुरुवात केली असता कंदलगाव येथे मृतदेह सापडला. नातेवाईकांना घटनास्थळी बोलाविण्यात आले. त्यांनी मृतदेहाची ओळख पटवून दिली. खुनामागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

साळवण-निवडेसह बोंद्रेनगर परिसरात हळहळ

महादेव बोडके हे गावात अनेक वर्षे पीठ गिरणीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. आर्थिक परिस्थितीमुळे चार ते पाच वर्षांपूर्वी त्यांनी गाव सोडून कोल्हापूर शहरातील बोंद्रेनगर रिंगरोड परिसरात वास्तव्यास येत रिक्षाचालक म्हणून काम सुरू केले होते. कष्टकरी रिक्षाचालकाचा खून झाल्याने साळवण-निवडे गावासह बोंद्रेनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news