

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या इंधनावर चालणार्या रिक्षांची वयोमर्यादा आता वीस वर्षे करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रिक्षा मीटरचे पुन:प्रमाणीकरण (कॅलिब्रेशन) करण्यास 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयाने जिल्ह्यातील सुमारे 14 हजारांवर रिक्षा चालकांना दिलासा मिळाला आहे.
रिक्षांची वयोमर्यादा वाढवून देण्याबाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणांनी निर्णय घ्यावा, असे आदेश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार विविध जिल्ह्यांच्या प्राधिकरणाद्वारे वयोमर्यादेत वाढ करण्यात आली होती. त्याच पद्धतीने जिल्ह्यातही पेट्रोल रिक्षांची वयोमर्यादा 20 वर्षे आणि एलपीजी, सीएनजी रिक्षांची वयोमर्यादा 25 वर्षे करावी, अशी मागणी रिक्षा संघटनाच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी पेट्रोलच्या रिक्षाची वयोमर्यादा वीस वर्षे आणि एलपीजी, सीएनजी वरील रिक्षांची वयोमर्यादा पंचवीस वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे. याच निर्णयाप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण वयोमर्यादा वाढवून द्या, अशी मागणी रिक्षा संघटनांच्या वतीने राजेंद्र जाधव, चंद्रकांत भोसले, मोहन बागडी यांच्या प्रमुख उपस्थितीत भेटलेल्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. याबाबत आजही शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी येडगे यांची भेट घेतली.
यावेळी या बैठकीला प्राधिकरणाचे सदस्य तथा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, सदस्य सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर उपस्थित होते. दरम्यान, हा निर्णय म्हणजे जनआंदोलनाचा विजय असल्याचे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, राजेंद्र जाधव, चंद्रकांत भोसले यांनी सांगितले.
कॅलिब्रेशनला अंतिम मुदतवाढ
प्राधिकरणाचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी झालेल्या बैठकीत सरसकट (सर्व इंधन प्रकाराच्या) रिक्षांना 20 वर्षे वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासह मीटर कॅलिब्रेशनला दि. 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ अंतिम असल्याचेही प्राधिकरणाने स्पष्ट केले.