कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील ऐतिहासिक गरुड मंडपासाठी चंद्रपूर येथील बराच भाग फिरून आणलेल्या खास सागवानी लाकडापासून बनवलेल्या 52 पैकी काही खांबांचे मापच चुकल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून गरुड मंडपाचे काम अडले होते. माप चुकलेल्या खांबांची दुरुस्ती करून सोमवारपासून खांब उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या कामासाठी देवस्थान समितीच्या स्वनिधीतून 12 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून गरुड मंडपाच्या पुनर्उभारणीचे काम सुरू आहे. मूळ गरुड मंडपाच्या लाकडी खांबांना तडे गेल्यामुळे नव्या कामाची आखणी करण्यात आली. मंडपाच्या पुनर्उभारणीचे काम एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे.
22 कारागिरांकरवी लाकडापासून 52 खांब तयार करण्यात आले. हे खांब दीर्घकाळ टिकावेत, हवामानाचा परिणाम होऊ नये यासाठी त्यांच्यावर ऑईल ट्रिटमेंट करण्यात आली. 15 एप्रिल 2025 रोजी पूर्णाहूती विधी करून खांब रोवण्याचा मुहूर्तही करण्यात आला. यासाठी लोखंडी पाईपचा सांगाडा तयार करण्यात आला. मात्र, तयार झालेल्या 52 खांबांपैकी 19 खांबांचे मापच चुकले आणि तांत्रिक अडचण उभी राहिली. खांबांच्या मापाचा अंदाजच चुकल्याने खांब उभारणीचे काम पूर्णपणे थांबले होते. मात्र, खांबांमधील तांत्रिक त्रुटी दूर करून लोखंडी रॉडच्या आधारे लाकडी खांब उभारणीला सुरुवात करण्यात आली.
लाकडी खांब उभारणीच्या कामात पावसाचा अडसर येऊ नये यासाठी देवस्थान समितीच्या वतीने सुरक्षेसाठी गरुड मंडपावर शेड उभारण्यात आले आहे. पावसाचा अंदाज घेत कामाचे नियोजन करण्यात आले आहे. नवरात्रौत्सवापूर्वी गरुड मंडपाच्या पुनर्उभारणीच्या कामाला गती देण्याच्या सूचना व्यवस्थापनाच्या वतीने कारागिरांना दिल्या आहेत, अशी माहिती देवस्थानचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी दिली.