

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या गोकुळमधील घड्याळ, जाजम खरेदीसह अन्य कारभाराबाबत केलेल्या तक्रारींची चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी सांगलीचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक सदाशिव गोसावी यांची नियुक्ती केली आहे. या चौकशीचा अहवाल 15 दिवसांत सादर करा, असे आदेश विभागीय उपनिबंधकानी (दुग्ध) दिले आहेत. यामुळे गोकुळमध्ये खळबळ उडाली आहे.
गोकुळकडून दूध संस्थांना भेट देण्यासाठी झालेल्या पावणेचार कोटींची घड्याळ व जाजम खरेदी यात घोटाळा झाल्याची तक्रार शिवसेनेने (उबाठा) गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांच्याकडे केली; मात्र पंधरा दिवसांत त्यावर लेखी उत्तर न मिळाल्याने सहायक निबंधक प्रदीप मालगावे यांना निवेदन दिले. त्याची प्रत विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांनाही पाठवत त्यांच्याशी चर्चा केली होती.
ही खरेदी निविदा प्रक्रिया न राबविता कोटेशन पद्धतीने केली. त्यामुळे ही खरेदी बेकायदेशीर आहे. त्यात घोटाळा झाला असून त्याची चौकशी करावी, असे या निवेदनात म्हटले होते. संचालकांनी सहकुटुंब केलेल्या गोवा सहलीवरही आक्षेप घेत दूध उत्पादक शेतकर्यांच्या घामाच्या पैशावर सहली करणे योग्य नाही. यावर लाखोंचा खर्च झाल्याचा तसेच पशुखाद्य घोटाळ्याची चौकशी करा, अशी मागणीही निवेदनात केली होती. केलेल्या मागणीवर चौकशी होणार असून अहवाल सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.