

कोल्हापूर : शहरातील मध्यवर्ती महाद्वार रोडवरील बिनखांबी गणेश मंदिरात गुरुवारी भरदिवसा दानपेटी फोडण्याचा प्रयत्न झाल्याने प्रशासन यंत्रणेची तारांबळ उडाली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती पदाधिकार्यांसह जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील अधिकार्यांनीही मंदिराला भेट देऊन पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. मात्र, चोरीचा प्रयत्न झाला नसल्याचे सांगण्यात आले.
अठरा ते वीस वयोगटातील अनोळखी तरुणाने हे कृत्य केल्याची बातमी परिसरात वार्यासारखी पसरली. काही भाविकांनी संबंधित तरुणाला हटकल्याने त्याने तेथून धूम ठोकल्याची चर्चा सुरू झाली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्यासह समितीच्या अन्य अधिकार्यांनी मंदिरास भेट देऊन पाहणी केली.
मंदिराचे पुजारी यांच्याशी चर्चा केली. सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी केली. मात्र, दानपेटी फोडण्याचा प्रयत्न झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी सायंकाळी मंदिराची पाहणी केली. चोरीच्या प्रयत्नाची अफवा असल्याचे त्यांनी सांगितले.