कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ संलग्न कोल्हापुरातील काही नामांकित महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी सहायक प्राध्यापक भरतीसाठी नुकत्याच मुलाखती झाल्या. यात दोन विषयांसाठी नियुक्ती केलेल्या दोन्ही उमेदवारांनी दोन वेगवेगळी जात प्रमाणपत्रे दिल्याची तक्रार शिवाजी विद्यापीठास प्राप्त झाली आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेत गोंधळ सुरू असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरू आहे.
सध्या शिवाजी विद्यापीठासह कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. शहरातील एका स्वायत्त महाविद्यालयामध्ये दोन विषयांसाठी मुलाखती झाल्या. भाषा विषयासाठी ज्या उमेदवाराची निवड केली, त्या उमेदवाराने इतर मागासवर्गीय प्रवर्गातून अर्ज केला आहे. परंतु, याच उमेदवाराने दोन महिन्यांपूर्वी एका स्वायत्त महाविद्यालयामध्ये ‘एसईबीसी’ प्रवर्गातून अर्ज केल्याचे समजते. मुळात हा उमेदवार शैक्षणिक व सामाजिकद़ृष्ट्या मागास प्रवर्गातून येतो. परंतु, संबंधित उमेदवाराने कायमस्वरूपी नोकरी मिळवण्यासाठी ओबीसी प्रवर्गाचा दाखला सादर करून नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समजते.
वाणिज्य शाखेच्या विषयासाठी नियुक्ती झालेला उमेदवार शैक्षणिक व सामाजिकद़ृष्ट्या मागास प्रवर्गातील आहे. परंतु, त्याने ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातून अर्ज करून त्याचीदेखील नियुक्ती बेकायदेशीररीत्या केल्याचे समजते. दोन्ही उमेदवारांच्या दाखल्यात गोंधळ असल्याच्या तक्रारी विद्यापीठास प्राप्त झाल्या आहेत. त्याअनुषंगाने चौकशी सुरू असून संबंधित संस्था आणि मागासवर्गीय प्रतिनिधी आणि विशेष कक्षाकडून माहिती घेण्याची कार्यवाही सुरू आहे. तक्रारींची शहानिशा झाल्यानंतर याबाबतचा पुढील निर्णय शिवाजी विद्यापीठ घेणार असल्याची माहिती विद्यापीठातील एका अधिकार्याने दिली.
शिवाजी विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयात नियुक्त केलेल्या कायमस्वरूपी सहायक प्राध्यापकांच्या जात वैधता प्रमाणपत्र तपासण्यासाठी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे उमेदवार बोगस प्रमाणपत्राचा वापर करून कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाने जात प्रमाणपत्र दाखल्याबाबत गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.