अश्विनी बिद्रे खून खटला : ‘त्या’ अधिकार्‍यांवर कारवाईचा बडगा?

Ashwini Bidre murder case | बिद्रे, गोरे कुटुंबीयांचा नऊ वर्षे संघर्ष
Ashwini Bidre murder case
अश्विनी बिद्रे खून प्रकरणPudhari File Photo
Published on
Updated on
दिलीप भिसे

सामान्य कुटुंबातून सहायक पोलिस निरीक्षकपदापर्यंत झेप घेतलेल्या अश्विनी यांच्या आयुष्यात वादळ उठेल, त्यांची हत्या होईल, शरीराचे तुकडे तुकडे करून वसईच्या खाडीत फेकून दिले जाईल ही कल्पनाच होऊ शकत नाही. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरसह सहकार्‍यांना पाठीशी घालणार्‍या यंत्रणांना कोणती शिक्षा? असा सवाल बिद्रे व गोरे कुटुंबीयांतून व्यक्त केला जात आहे. अभय कुरुंदकरला पाठीशी घालणार्‍या त्या चार वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांवर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.

आळते (ता. हातकणंगले) सारख्या ग्रामीण भागातून सहायक पोलिस निरीक्षकपदापर्यंत झेप घेतलेल्या तरुणीच्या भोळ्याभाबड्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन पोलिस खात्यात वरिष्ठ पदावर असलेल्या एका अधिकार्‍याने क्रूरपणे हत्या करावी, यावर विश्वास तरी ठेवावा कसा; पण अभय कुरुंदकर याने साथीदारांच्या मदतीने अश्विनी बिद्रे यांचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले आहे.

पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायाधीश कृ. प. पालदेवार यांनी राज्यभरात खळबळ उडवून देणार्‍या अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी मुख्य सूत्रधार अभय कुरुंदकर, त्याचा साथीदार महेश फळणीकर, कुंदन भंडारी या तिघांना शनिवारी (दि. 5 ) दोषी ठरविले, तर राजू पाटील याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. दोषी ठरविलेल्या अभय कुरुंदकरसह दोघा साथीदारांना सोमवारी शिक्षा सुनावण्यात आली. या निकालाकडे राज्यासह पोलिस दलाचे लक्ष लागले होते.

राजकीय आश्रय आणि वरिष्ठांच्या कृपाशीर्वादामुळे अभय कुरुंदकरने पोलिस दलात स्वतःचा असा वेगळा दबदबा निर्माण केला होता. म्हणेल ती पोस्टिंग आणि म्हणेल तो आदेश... असा त्याचा तोरा होता. आजवर त्याने ज्या जिल्ह्यात नोकरी केली तेथे त्याच्या पसंतीच्या ठिकाणीच काम केलेे. सांगली जिल्हा हा तसा संवेदनशील आणि राजकीयद़ृष्ट्या ज्वलंत; पण तेथेही त्याने स्थानिक गुन्हे अन्वेषणला दोनवेळा नियुक्तीची ऑर्डर करून घेण्यास भाग पाडले. असा त्याचा दबदबा. त्यामुळे वरिष्ठ माझ्या खिशात अशाच तो भ्रमात राहिला.

अश्विनी 2010 ते 2012 या काळात सांगली पोलिस दलात उपनिरीक्षक पदावर कार्यरत होत्या. त्यावेळी कुरुंदकर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या निरीक्षक पदावर होता. दोघेही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत असल्याने त्यांच्यात सलोखा निर्माण झाला. 2012 नंतर अश्विनी यांची रत्नागिरीला बदली झाली. कुरुंदकरने सांगलीतून सुरू झालेला पाठलाग रत्नागिरीपर्यंत कायम ठेवला. रत्नागिरीला त्याच्या फेर्‍या वाढल्या. या सार्‍या घटनाक्रमात अश्विनी कुरुंदकरच्या जाळ्यात फसत गेल्या. अश्विनी यांनी कुरुंदकर याच्यावर विश्वास ठेवला; पण कुरुंदकरने मात्र त्यांचा विश्वासघात केला.

पोलिस अधिकारी असल्याने आपली निर्घृण हत्या होईल, असे अश्विनी यांना स्वप्नातही वाटले नसावे. 11 एप्रिल 2016 मध्ये अभय कुरुंदकरने त्याच्या फ्लॅटमध्ये त्यांची निर्घृण हत्या केली. लाकडे कापणार्‍या कटरने अश्विनी यांच्या शरीराचे लहान लहान तुकडे करून तीन दिवस फ्रिजमध्ये ठेवले. साथीदार कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांच्या मदतीने पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने अश्विनी यांच्या शरीराचे तुकडे खाडीत फेकून दिले. आयुष्यातून अश्विनी यांचा विषय संपला... आता आपणाला कोण विचारणार... अशा भ्रमात अभय कुरुंदकर राहिला. 31 जानेवारी 2017 मध्ये कळंबोली पोलिस ठाण्यात अश्विनी बिद्रे यांच्या अपहरणासह खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला.

अश्विनी बिद्रे यांची हत्या झाली आणि यामागे अभय कुरुंदकरसह टोळीचा हात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. विशेषकरून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत मुख्य सूत्रधार अभय कुरुंदकर याच्या नावाची उघड चर्चा होती. मात्र, या चर्चेची जाणीव होताच फरार काळात कुरुंदकरचा कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत वावर वाढला. काहीकाळ खुनाची चर्चा थांबली. मात्र, पती राजू गोरे, अश्विनी यांचे वडील जयकुमार बिद्रे, भाऊ आनंद बिद्रे यांनी अश्विनी यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून न्यायालयातही दाद मागितली. तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याकडेही धाव घेतली. तत्कालीन राष्ट्रपती आणि तत्कालीन सरन्यायाधीश यांच्यामुळे अश्विनी यांच्या खुनाला वाचा फुटली. 7 डिसेंबर 2017 मध्ये अभय कुरुंदकरला अटक झाली. त्यानंतर कुंदन भंडारीसह महेश फळणीकरला पोलिसांनी जेरबंद केले.

अधिकाराचा गैरवापर आणि स्वतः केलेला खुनासारखा गंभीर गुन्हा दडपून टाकण्यासाठी अभय कुरुंदकरने राजकीय दबाव तंत्राचाही वापर केल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात अभय कुरुंदकरच्या नावाची चर्चा असतानाही राष्ट्रपती पुरस्कारासाठी त्याच्या नावाची शिफारस करण्यात आल्याचे न्यायालयाच्याही निदर्शनास आले आहे. केवढा हा रुबाब आणि केवढी ही दहशत; पण अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी अश्विनी बिद्रे यांच्या खुनाचा आरोप सिद्ध झाल्याचे जाहीर करताच कुरुंदकरच्या भ्रमाचा भोपळा फुटला आणि त्याला पुन्हा तळोजा कारागृहात जावे लागले. निकालाच्या आदल्या दिवशी रविवारी रात्रभर तो जागा होता. कोठडीतून बाहेर येणार, असे तो आत्मविश्वासाने सांगत होता. मात्र, त्याचा मुक्काम यापुढेही कारागृहातच जाणार हे स्पष्ट झाल्यानंतर कारागृहातील कैदीच त्याच्यावर फिदीफिदी हसू लागले.

अभय कुरुंदकरच्या भ्रमाचा भोपळा फुटला

हत्या झालेल्या सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांचा पोलिसांना मृतदेहच सापडला नाही. त्यामुळे निर्दोष मुक्तता होईल, अशा भ्रमात असलेल्या अभय कुरुंदकरचा अखेर भ्रमाचा भोपळा फुटलाच. कारागृहातील शेवटचा दिवस म्हणून त्याने निकालादिवशी सोमवारी (दि. 21) सकाळी सहकारी कैद्यांचा निरोपही घेतल्याची चर्चा होती. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाशी हात मिळवत आणि हसत कुरुंदकर पनवेलच्या कोर्टात पोहोचला. जणू काही आपली सुटकाच झाली, असा त्याचा तोरा होता.

अश्विनी यांच्या संपर्कातील चार साक्षीदार गायब!

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी एकूण 84 साक्षीदार तपासले. मात्र, अगदी शेवटपर्यंत अश्विनी बिद्रे ज्यांच्या संपर्कात होत्या. त्या चारजणांचे तपासाधिकार्‍यांनी जबाब नोंदविले खरे; पण यापैकी एकाचीही न्यायालयात साक्ष होऊ शकली नाही. संबंधितांचे पत्तेच उपलब्ध होऊ न शकल्याने त्यांना समन्स बजावता आले नाही, असे पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या अहवालामध्ये नमूद केले आहे. चारही साक्षीदार अचानक गेले कोठे? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. अश्विनी यांच्या मोटारीची साफसफाई करणारा कामगार, कपडे धुण्यासह कपडे इस्त्री करणारी महिला आणि कळंबोली परिसरात भाड्याचे घर मिळवून देणार्‍या एजंटचा त्यामध्ये समावेश आहे. या तिघांना साक्षीदार करण्यात आले होते. मात्र, अचानक चौघेही गायब झाले. याला काय म्हणायचे?

घटनाक्रम

11 एप्रिल 2016 : अश्विनी बिद्रेंची हत्या

31 जानेवारी 2017 : कळंबोली पोलिस ठाण्यात अपहरण, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

फेब्रुवारी 2017 : गुन्हा दाखल होताच अभय कुरुंदकर गायब

7 डिसेंबर 2017 : कुरुंदकरला अटक

20 फेब्रुवारी 2018 : अभय

कुरुंदकरचा मित्र कुंदन भंडारीला अटक

27 फेब्रुवारी 2018 : अश्विनी यांचा

खून करून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा

19 मे 2018 : कुरुंदकरसह साथीदारांवर दोषारोपपत्र दाखल

5 एप्रिल 2025 : कुरुंदकरसह तिघे दोषी.

21 एप्रिल 2025 : कुरुंदकरला जन्मठेप, तर अन्य दोघांना सात वर्षांचा कारावास.

...अधिकार्‍यांनी ढुंकूनही पाहिले नाही

अश्विनी यांची कळंबोली येथील निवासाची खोली आणि अभय कुरुंदकरच्या भाईंदर येथील फ्लॅटची तपासणी करून दोन्हीही खोल्या सील करण्याची बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी तेथील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडे एक-दोनवेळा नव्हे, दहावेळा मागणी केली; पण अधिकार्‍यांनी स्वत:हून खोल्यांकडे ढुंकूनही पाहिले नाही. घरातील मोबाईल, लॅपटॉप या वस्तू काहीकाळ तेथे पडूनच होत्या.

मातेच्या प्रेमापासून हिरावले

अश्विनी बिद्रे यांच्या खुनाचा सर्वाधिक मोठा फटका वयाची पाच वर्षे ओलांडून सहाव्या वर्षात पदार्पण केलेल्या त्यांच्या मुलीला सोसावा लागला. मातेच्या अंगाखांद्यावर खेळलेल्या या चिमुरडीला आपल्या मातेचा खून झाल्याची बालवयात कल्पना नव्हती. मम्मा अजून घरी का आली नाही, अशीच ती वडील आणि आजोबांकडे सवाल करायची. वयाच्या सातव्या वर्षी तिला समजले की, आपल्या मातेचा खून झाला आहे. ती या जगात नाही. ती देवाघरी गेल्याचे समजताच चिमुरडीला धक्का बसला. घरात सार्‍यांशीच तिने अबोला धरला. मातेची आठवण झाली की, फोटोजवळ जाऊन तास-दीड तास ती अश्रू ढाळायची. काय केला होता तिने गुन्हा? असाच प्रश्न ती घरातील मंडळींना करत होती. लष्करात सारे आयुष्य घालविलेल्या आजोबांनाही या प्रश्नाने हुंदका आवरत नव्हता; पण ते काही बोलू शकत नव्हते. चिमुरडीची समजूतच काढत होते. वडील राजू गोरे मुलीसमोर थांबत नव्हते. सार्वजनिक कार्यक्रम, नातेवाईकांचे समारंभ याच्याकडे कुटुंबीयांनी पाठ फिरविली होती. अगदी नात्यातील लोकांशी त्यांनी अबोला धरला होता. अश्विनी यांचा क्रूर खून सार्‍यांच्या काळजाला भिडला होता. वेदना देणारा ठरला होता. त्यांची मुलगी म्हणते, मातेने एवढा मोठा काय गुन्हा केला होता? मातेच्या प्रेमापासून मला का हिरावले? ज्याने मातेची हत्या केली त्याला जीवन जगण्याचा अधिकार तरी आहे काय, असा सवाल सिद्धी आजही करत आहे.

मारेकर्‍यांच्या दहशतीखाली पत्नीच्या न्यायासाठी अहोरात्र धडपड

राजू गोरे हा उमदा कार्यकर्ता. हातकणंगलेसह परिसरात सामाजिक कार्यात त्याचा पुढाकार असे. चारचौघांत उठबस असलेल्या राजू गोरे यांच्याच पोलिस दलात अधिकारी असलेल्या पत्नीची क्रूर हत्या झाल्याचे समजताच तालुक्यासह जिल्हा हादरला. राजू गोरे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पत्नीचा खून करणार्‍या नराधमांना अटक व्हावी, फाशी व्हावी, यासाठी त्यांची कोल्हापूरपासून मुंबई मंत्रालयात वारी सुरू झाली. लोकप्रतिनिधींच्या घरांच्या उंबर्‍यासह मंत्रालयाच्या पायर्‍या झिजवल्या. त्यांनी सर्वांपुढे कैफियत मांडली; पण एकाही लोकप्रतिनिधीने त्यांची कैफियत समजून घेतली नाही की, सत्ताधार्‍यांना कारवाईसाठी भाग पाडले नाही. पत्नीला न्याय मिळावा, यासाठी मुंबईच्या फेर्‍या करणार्‍या राजू गोरे यांचा महामार्गावर पाठलाग करण्याचाही प्रयत्न झाला. हातकणंगले येथील एका हॉटेलमध्येही चार-पाच अनोळखी तरुणांच्या बैठकीत राजू गोरे यांच्या खुनाची चर्चा झाली. ही खबर राजू गोरे यांना मिळताच त्यांनी थेट पोलिस अधीक्षक कार्यालय गाठून तक्रार केली. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दखल घेतल्यामुळे कदाचित हा प्रकार टळला असेल; पण राजू गोरे खचले नाहीत. डगमगले नाहीत. त्यांचा लढा चालूच राहिला. अभय कुरुंदकरला शिक्षा हेच त्यांचे टार्गेट राहिले. न्यायालयाने कुरुंदकरसह तिघांना दोषी ठरविले आहे. केवळ संघर्ष केल्यामुळेच मला हा न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया राजू गोरे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news