अश्विनी बिद्रेची क्रूर हत्या; पोलिस निरीक्षक कुरुंदकरच्या कृत्याने पोलिस खात्याला काळिमा

न्यायासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनाही साकडे
Ashwini Bidre murder case
अभय कुरुंदकर याला पोलिस न्यायालयात नेताना.Pudhari File Photo
Published on
Updated on
दिलीप भिसे

स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी आळते (ता. हातकणंगले) येथील अश्विनी बिद्रे पोलिस दलात उपनिरीक्षक पदावर दाखल झाली. 2013 मध्ये सहायक पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नती झाली. ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील तरुणी पोलिस दलात भरारी घेत असतानाच याच खात्यात वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या अभय कुरुंदकरच्या ती संपर्कात आली. त्यांच्यातील आकर्षण वाढत गेले आणि काही काळात अश्विनीच्या आयुष्यासह तिच्या कुटुंबीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. अश्विनीची हत्या करून जनावराची कत्तल करावी अगदी त्याच पद्धतीने कायद्याचा रक्षक असलेल्या अभय कुरुंदकरने मित्रांच्या मदतीने तिच्या मृतदेहाचे कटरच्या सहाय्याने तुकडे केले. लहान लहान तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तुकडे लोखंडी पेटीत भरून वसईच्या खाडीत फेकून दिले...

अंगावर शहारे आणणारी आणि माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना मुंबईतल्या भाईंदर परिसरात 11 एप्रिल 2016 रोजी घडली. ठाणे ग्रामीण पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या आणि राष्ट्रपती पदक विजेत्याच्या यादीत समाविष्ट असलेल्या अभय कुरुंदकर यानेच मित्रांच्या मदतीने सहायक महिला पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हिची थंड डोक्याने हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी केलेल्या क्लृप्त्या चव्हाट्यावर आल्यानंतर महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ उडाली. तत्कालीन मुख्यमंत्र्यांसह राज्याचे तत्कालीन पोलिस महासंचालक अवाक् झाले. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यांसह सार्‍या महाराष्ट्रात हा चर्चेचा विषय ठरला.

अश्विनीच्या अमानुष खुनानंतर आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी केलेल्या प्रयत्नानंतरही अश्विनी बिद्रे जिवंत आहे हे भासविण्यासाठी अभय कुरुंदकरने अश्विनीच्या वापरातील मोबाईलचा थंड डोक्याने वापर केला. तिच्याच मोबाईलवरून मेहुणे अविनाश यांच्यासह नातेवाइकांना मेसेज पाठविले. मानसिक स्वास्थ्य आणि उपचार घेण्यासाठी आपण पाच ते सहा महिने उत्तरांचल अथवा हिमाचलला जात आहोत, असा मेसेजद्वारे निरोप देऊन कुटुंबीयांसह नातेवाईकांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. अखेर अश्विनीचे आई, वडील, भाऊ आणि पती राजू गोरे यांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतर गृहखात्याला या प्रकरणाची दखल घ्यावी लागली. मुख्य संशयित अभय कुरुंंदकरसह त्याचे मित्र राजेश पाटील, महेश फळणीकरला बेड्या ठोकून गजाआड केले.

सांगली जिल्ह्यातील 2010-2011 चा काळ...

अश्विनीची 2005 मधील प्रशिक्षणानंतर पुणे येथे नियुक्ती झाली. त्यानंतर त्या काही काळ प्रसूती रजेवर गेल्या. 2010 मध्ये त्यांची सांगली पोलिस दलात उपनिरीक्षक पदावर बदली झाली. या काळात अभय कुरुंंदकरचा स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक म्हणून दरारा होता. यावेळी उपनिरीक्षक म्हणून अश्विनीला सांगली एलसीबीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. याच काळात सांगलीतील दोन कोटी रुपयांचा एटीएम घोटाळा उघडकीला आला. अभय कुरुंदकर स्वत: तर सहायक म्हणून अश्विनी बिद्रे यांच्यावर तपासाची जबाबदारी होती. नेमके याच काळात अभय कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे यांच्यात जवळीक वाढली. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या लक्षात येईपर्यंत त्यांच्यात घनिष्ठ संबंध कायम होते.

सांगली जिल्ह्यातून 2013 मध्ये अश्विनीची रत्नागिरी पोलिस दलात नियुक्ती झाली. अश्विनी रत्नागिरीला हजर झाल्यानंतर अभय कुरुंदकरच्या रत्नागिरीच्या फेर्‍या वाढू लागल्या. अश्विनीला भेटण्यासाठी अभय वारंवार रत्नागिरीला जात असे. याकाळात त्याने अश्विनीकडे लग्नासाठी तगादा लावला. अश्विनीचे आई, वडील, भाऊ, पती राजू आणि चिमुकल्या सूचीवर अपार प्रेम... एका ठरावीक अंतरावर कुरुंदकरशी तिची ओळख ठीक होती. मात्र त्याने थेट पतीला सोडून लग्नाची गळ घातल्याने दोघांत वादावादीला सुरुवात झाली. दोघांतील भांडणांचे प्रकरण अश्विनीच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचलं. अश्विनीच्या पतीनेही अभयला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र कुरुंदकरची मात्र कोणत्याही स्थितीत ऐकण्याची मन:स्थिती नव्हती. अश्विनीला गायब करण्यासह तिला जीवे मारण्याच्या त्याच्याकडून धमक्या सुरूच होत्या.

रत्नागिरी जिल्ह्यातून अश्विनीची 2015 मध्ये नवी मुंबईत (पीसीआर) मुख्यालयाला बदली झाली. त्याच काळात कळंबोली येथून अश्विनी बेपत्ता झाली. अश्विनी अचानक बेपत्ता झाल्याने आई, वडील, भाऊ, पतीसह नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला. तिचा थांगपत्ता लागत नव्हता. मात्र तिच्या मोबाईलवरून वेगवेगळे मेसेज येत राहिल्याने सार्‍यांचीच संभ—मावस्था सुरू झाली. नेमके काय करावे, कुठे शोध घ्यावा, उत्तराचंलला जावे की, हिमाचल प्रदेश गाठावे... मनात एक ना अनेक प्रश्न... अभय कुरुंदकरने अश्विनीला गायब करण्याची तसेच तिला जीवे मारण्याची दिलेली धमकी सार्‍यांचीच चिंता वाढविणारी होती.

बिद्रे बेपत्ता, पोलिसात नोंद

पती राजू गोरे, लष्करातील निवृत्त सैनिक असलेले वयोवृद्ध वडील जयकुमार बिद्रे, भाऊ आनंद बिद्रे यांनी मुंबई अनेक ठिकाणी शोध घेतला. अश्विनीच्या मैत्रिणींशी संपर्क साधला. नातेवाईकांचे उंबरेही झिजवले. कोल्हापूर, सांगली, सातारा. रत्नागिरीसह कोकण पट्ट्यात शोध घेतला. पण अश्विनीचा शोध लागला नाही. तीन महिन्यांच्या शोधानंतर 14 जुलै 2016 रोजी बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी कळंबोली पोलिस ठाणे गाठले. अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.

कुटुंबाला वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी झिडकारले

महिला पोलिस अधिकारी मुंबईतून बेपत्ता होते, ही बाब तशी गंभीर... पण वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना या घटनेचे सोयरसुतक नव्हते. 17 जुलै 2016 रोजी पती राजू गोरे यांचा महत्त्वपूर्ण जबाब झाला. जबाबात गोरे यांनी अभय कुरुंदकर याच्या नावाचा स्पष्ट उल्लेख करून कुरुंदकर यानेच अश्विनी बिद्रे हिचा घातपात घडवून आणल्याचा थेट संशय व्यक्त केला होता. तरीही पोलिसांची कार्यवाही शून्यच. त्यानंतर कुटुंबीयांनी ऑगस्ट 2016 मध्ये पोलिस आयुक्तांची भेट घेतली. त्यांनीही एखादे प्रकरण झिडकारावे तसे बिद्रे-गोरे कुटुंबीयांना झिडकारून लावले.

वरिष्ठांकडून पाठराखणीचा आरोप

वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडून संशयिताची पाठराखण करीत असल्याचे लक्षात येताच राजू गोरे यांनी ऑक्टोबर 2016 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. न्यायालयाने दखल घेत संगीता शिंदे अल्फान्सो, विश्वास पांढरे, प्रकाश निलेवार यांची चौकशी अधिकारी म्हणून समिती गठित झाली. समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुंबई उच्च न्यायालयाला चौकशी अहवाल सादर केला. 31 जानेवारी 2017 रोजी कळंबोली पोलिस ठाण्यात मुख्य संशयित अभय कुरुंदकर याच्याविरुद्ध अपहरण व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अखेर कुरुंदकर हजर

संशयित अभय कुरुंदकर याच्याविरुद्ध थेट कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच ठाणे, मुंबई परिसरातून बेपत्ता झाला. कुटुंबीयांचा आक्रोश होत असतानाही वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी गांधारीची भूमिका घेतली होती. अश्विनीच्या वृद्ध वडिलांसह मातोश्रींनीही वरिष्ठ अधिकार्‍यांच्या गाठीभेठी घेतल्या. पण त्यांना पाझर फुटला नाही. तत्कालीन राष्ट्रपती, पंतप्रधान, तत्कालीन मुख्यमंत्री, तत्कालीन गृहमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे कैफियत मांडली. अभय कुरुंदकरच्या अटकेसाठी वरिष्ठ अधिकार्‍यांकडून दबाव वाढल्याने 20 ऑक्टोबर 2017 रोजी कुरुंदकर कळंबोली पोलिस ठाण्यात हजर झाला.

कटरने मृतदेहाचे तुकडे

तपास अधिकारी तथा सहायक पोलिस आयुक्त संगीता शिंदे अल्फान्सो यांनी केलेल्या तपासात अभय कुरुंदकर हा बेपत्ता सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हिच्या खुनात मुख्य मारेकरी असल्याचे निष्पन्न झाले. शिवाय त्याचे विश्वासू साथीदार असलेल्या राजू पाटील आणि महेश फळणीकर, कुंदन भंडारी यांचीही नावे निष्पन्न झाली. चौकशी सुरू असताना अनेक धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आले. अश्विनी बिद्रेच्या हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे इलेक्ट्रिकल कटरचे लहान लहान तुकडे करण्यात आले. हात, पाय, मुंडके आणि डोके याची विल्हेवाट लावण्यात आली; तर धड पेटीत भरून वसईच्या खाडीत फेकून देण्यात आले. कटरने मृतदेहाचे केलेले तुकडे तीन दिवस फ्रिजमध्ये ठेवल्याचेही चौकशीत उघड झाले होते.

मुलीसह स्वत:च्या जीविताला धोका : पतीचे निवेदन

अश्विनी बिद्रे खुनाचा छडा लावण्यासाठी बिद्रे व गोरे कुटुंबीयांनी मंत्रालयासह उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा केला होता. काही मंडळींनी पती राजू गोरे यांच्या मोटारीचा पाठलाग करून जीवे मारण्याची धमकीही दिली होती. तत्कालीन व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे वेळोवेळी मागणी करून मुलीसह स्वत:ला धोका असल्याचे निवेदन दिले होते. हातकणंगले येथील एका बारमध्ये काहीजण आपल्या खुनाची चर्चाही करीत होते. याकडेही राजू गोरे यांनी फडणवीस व राज ठाकरे यांचे लक्ष वेधले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ तत्कालीन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याशी संपर्क साधून त्यांना सूचना दिल्या होत्या.

84 साक्षीदार अन् 900 पानांची साक्ष!

पनवेल येथील सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्या न्यायालयात खटल्याचे कामकाज सुरू आहे. सरकार पक्षामार्फत विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत कामकाज पाहात आहेत. खटल्यात 84 साक्षीदार तपासण्यात आले आहेत. मुख्य आरोपी अभय कुरुंदकरसह चौघांचेही जबाब नोंदविण्यात आले आहेत. खटल्यात सुमारे 900 पानांची साक्ष न्यायालयात जमा झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news